खासदार संजय पाटील यांचा कदम- बाबरांसोबतचा वाढता स्नेह

खासदार संजय पाटील यांचा कदम- बाबरांसोबतचा वाढता स्नेह

कडेगाव - खासदार संजय पाटील यांनी वडियेरायबागच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या कामावर स्तुतिसुमने उधळली होती. तासगावचा साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रयत्न सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून  चालवण्यासाठी घ्यायचा प्रयत्न मोहनराव कदम यांनी  केला होता.

त्यावेळी या दोघांमध्ये बिनसले होते. तेच नागेवाडीच्या यशवंत सहकारी साखर कारखान्यांच्या खरेदीच्या निमित्ताने आमदार अनिल बाबर यांच्याबाबतीत झाले होते. मात्र, आता या दोघांशीही जुळवून घेण्याचा प्रयत्न संजय पाटील यांनी गेल्या काही महिन्यांत केल्याचे दिसून येते. 

पलूस, कडेगाव आणि खानापूर या तालुक्‍यांच्या राजकारणात कदम-बाबर यांच्यातील सूत जगजाहीर  आहे. आटपाडी-खानापूर मतदारसंघात तासगाव तालुक्‍यातील विसापूर गटाचा समावेश झाल्यानंतर तिथल्या राजकारणात संजय पाटील यांची थेट प्रवेश झाला. पाटील यांनी त्यावेळी बाबर व आर. आर. पाटील यांचे मैत्रीसंबंध पाहता. संजय पाटील ओघानेच सदाशिवराव पाटील यांच्याकडे कलले.

गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये तोच कल कायम राहिला. आर. आर. पाटील व पतंगराव अशी नेतेमंडळी आता नाहीत. मात्र राजकारणातील एकेकाळचे शत्रू कधी मित्रही होतात. म्हणूनच राजकारण प्रवाही असते याचा प्रत्यय  येत असून नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत.  

बाबर, कदम यांच्यासोबत व्यासपीठावर प्रसंगपरत्वे आलेल्या खासदार पाटील यांनी या नव्या राजकीय घरोब्याचे संदर्भ स्पष्ट केले आहेत. कदम यांचे विरोधक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासोबतचे खासदारांचे ‘सख्य’ जगजाहीर आहे. त्याचवेळी विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याशीही असलेले खासदारांचे मधुर संबंध आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. येत्या लोकसभा निवडणुकीत विश्‍वजित कदम यांची उमेदवारी काँग्रेसकडून असेल किंवा नसेल यावर खासदारांचे नव्याने जुळून येणारे स्नेहसंबंध वाढणार की संपणार हे स्पष्ट होणार आहे.

पलूस - कडेगावमधून खासदारांना २७ हजार ८२७ इतके मताधिक्‍य मिळाले होते. त्याचे श्रेय कोणाला याबद्दलही चर्चा होत राहिली. मात्र देशमुख गटाला ते श्रेय निःसंशय मिळाले नव्हते. संग्रामसिंह देशमुख यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी मध्यंतरी झालेल्या हालचालीवरून देशमुखांची नाराजी वाढली आहे. त्याची भरपाई करण्यासाठी खासदार पाटील यांनी या  मतदारसंघात कदम गटाशी सलगी वाढवली आहे. वडियेरायबागचा कार्यक्रम त्याचाच एक भाग होता. कदम आणि बाबर यांची सलगी पाहता या प्रेमसंबंधात आता खासदारांची भर पडते का याचीची चर्चा सुरू झाली आहे. 

मतदारसंघ - पलूस-कडेगाव

  •  पुरुष मतदार- १ लाख ३८ हजार ९०७
  •  स्त्री मतदार- १ लाख ३५ हजार ७२६
  •  तृतीयपंथी मतदार- ५
  •  एकूण मतदान- २ लाख ७४ हजार ६३८
  •  एकूण मतदान केंद्रे- २८३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com