कोण किती पाण्यात दाखविणारी निवडणूक 

विकास कांबळे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - गटातटाच्या राजकारणात कागलमध्ये निवडणुकीच्या वेळी नेहमी कोणते ना कोणते दोन गट एकत्र येत असतात. यावेळची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरणार आहे. कागलमधील प्रमुख गटांपैकी मंडलिक गट, आमदार हसन मुश्रीफ गट व विक्रमसिंह घाटगे गट जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकल्याने कागलमध्ये कोण किती पाण्यात आहे, हे निकालातून स्पष्ट होणार आहे. याशिवाय तालुक्‍यातील छोट्या छोट्या गटांनीदेखील या निवडणुकीत उचल खाल्ल्याने त्यांचा फटका प्रस्थापितांना बसणार, की विरोधकांना याकडेही लक्ष लागून राहिले आहे. 

कोल्हापूर - गटातटाच्या राजकारणात कागलमध्ये निवडणुकीच्या वेळी नेहमी कोणते ना कोणते दोन गट एकत्र येत असतात. यावेळची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरणार आहे. कागलमधील प्रमुख गटांपैकी मंडलिक गट, आमदार हसन मुश्रीफ गट व विक्रमसिंह घाटगे गट जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकल्याने कागलमध्ये कोण किती पाण्यात आहे, हे निकालातून स्पष्ट होणार आहे. याशिवाय तालुक्‍यातील छोट्या छोट्या गटांनीदेखील या निवडणुकीत उचल खाल्ल्याने त्यांचा फटका प्रस्थापितांना बसणार, की विरोधकांना याकडेही लक्ष लागून राहिले आहे. 

कागलमध्ये बराच काळ मंडलिक व घाटगे असे दोन प्रमुख गट होते. त्यामध्ये मंडलिक व आमदार मुश्रीफ एकत्र आणि विक्रमसिंह घाटगे व संजय घाटगे एकत्र असत. याशिवाय मुरगूडकर पाटील यांचाही गट त्यांच्या परिसरापुरता मर्यादित आहे. (कै.) सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात वाद झाल्याने मुश्रीफ यांनी मंडलिक गटापासून फारकत घेतली आणि आपला स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामुळे मंडलिक गटाचे नेतृत्व आपोपाच (कै.) मंडलिक यांचे पुत्र प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे आले. विक्रमसिंह घाटगे यांच्यापासून संजय घाटगे बाजूला झाले. सध्या ते मंडलिक गटासोबत आहेत; पण संजय घाटगे यांची ताकदही तशी मुरगूडकर-पाटील गटासारखी मर्यादित आहे. त्यामुळे विक्रमसिंह घाटगे यांचा गट स्वतंत्रच राहिला. विक्रमसिंह घाटगे यांच्या अकाली निधनानंतर या गटाचे काय होणार, अशी चर्चा कागलमध्ये सुरू होती; पण विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र समरजितसिंह घाटगे यांनी घाटगे गटाची सूत्रे हाती घेतली. 

विक्रमसिंह घाटगे यांनी दहा वर्षांपूर्वी निवडणुकीच्या राजकारणापासून बाजूला राहण्याचा निर्णय घेतला. अखेरपर्यंत त्यांनी ते पाळले. ज्या गटाशी आघाडी होत असे, त्या गटाचे नेते घाटगे गटाला काही जागा सोडत. यामुळे प्रत्येक निवडणुकीत घाटगे गटाचे कार्यकर्ते थोडे इकडे, थोडे तिकडे जायचे. राजेही त्यांना कधी विचारत नव्हते. त्यामुळे हा गट तसा विस्कळित झाला होता. त्या गटाची पुनर्बांधणी करण्याचे काम प्रथम समरजितसिंह घाटगे यांनी हाती घेतले. विशेष म्हणजे या कामाला त्यांच्या घरातूनही साथ मिळत असल्यामुळे सध्या ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्‍यात ठाण मांडून आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीतील अनुभव लभात घेऊन त्यांनी कागलमध्ये घाटगे गट म्हणून स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली. गेल्या दहा वर्षांत हे झाले नव्हते. 

आमदार हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत. मंडलिक गटातून बाहेर पडूनही ते विधानसभा निवडणुकीत आपली जागा राखण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे त्यांना विधानसभा निवडणुकीत सर्व गटांनी अक्षरश: घेरले होते. तरीही त्यातून ते यशस्वी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत. 

प्रा. संजय मंडलिक सध्या शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये त्यांनी आपला मुलगा वीरेंद्र यांचेही प्रमोशन केले आहे. या प्रमोशनच्या नादात मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मंडलिक गटासाठी काम करणारा (कै.) हिंदुराव पाटील यांचा गट मात्र त्यांच्यापासून बाजूला गेला. मंडलिकांच्या अडचणीच्या काळात अनेकजण त्यांच्या पाठिशी राहिले, त्यात पाटील गटाचा समावेश होता. भूषण पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी मंडलिक गटाला रामराम ठोकून थेट त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. यामुळे त्यांचा फटका कोणाला तरी बसणार आहे. 

संजय घाटगे यांचा गट आहे; पण त्याचा प्रभाव काही गावांपुरता मर्यादित आहे. असे असले तरी ते निवडणूक आल्यावर कोणत्या तरी गटाशी जुळवून घेऊन आपले साधून घेत असतात. यावेळी ते मंडलिक गटासोबत आहेत. त्यांनी देखील आपले पुत्र अंबरिष घाटगे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरविले आहे, मात्र त्यांच्या विरोधात आमदार मुश्रीफ व घाटगे गटाचेही तगडे उमेदवार आहेत. यामुळे संजय घाटगे यांचा त्यांच्याच गावात कस लागणार आहे. 

या निवडणुकीत मुरगूडकर-पाटील गटात म्हणण्यापेक्षा भावा-भावांमध्ये मात्र प्रथमच फूट पडली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीतच गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांना समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत राहवे लागत आहे. रणजितसिंह पाटील यांचा निर्णय त्यांचे बंधू प्रवीणसिंह पाटील यांना मान्य नव्हता. त्यांनी राष्ट्रवादी नेते आमदार हसन मुश्रीफ यांना आपला पाठिंबा जाहीर केला. आशा पद्धतीने सर्वच प्रमुख यावेळी एकमेकांसमोर ताकदीने उभा ठाकले आहे. तालुक्‍यावरील वर्चस्व सिद्ध करणारी ही निवडणूक असल्यामुळे तिनही गटांनी चांगली कंबर कसली आहे. 

Web Title: kagal politics