कुरळ्या केसांचा कैलाश छा गया..... 

संदीप खांडेकर
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

सेल्फीसाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता 
हेअर स्टाईलमुळे चर्चेत आल्याने कैलाशसमवेत सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असल्याचे दिसत आहेत. तो मात्र गायनात विद्यापीठाला बक्षीस मिळवून द्यावे, यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. 

कोल्हापूर - बाराशेहून अधिक कलाकारांचा भरणा. प्रत्येक जण आपल्या संस्कृतीने नटलेला; पण त्यातही केरळमधला कैलाश चंद्रनच प्रत्येकाच्या नजरेत भरला आहे. त्याने केलेली खास "हेअर स्टाईल' हे त्या मागचे कारण आहे. सत्यसाईबाबांप्रमाणे त्याची ही स्टाईल शिवोत्सवात चर्चेची तर ठरली आहेच, शिवाय त्याच्या सोबत सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरेनासा झाला आहे. 

कैलाश हा केरळ विद्यापीठाचा विद्यार्थी. तो मूळचा त्रिवेंद्रमचा असून, अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकत आहे. गायक म्हणून तो महोत्सवात सहभागी झाला असून, केरळ विद्यापीठाला गायनाच्या क्षेत्रात बक्षीस मिळवून द्यावे, यासाठी तो आला आहे. मात्र तो डोक्‍यावर वाढविलेल्या वर्तुळाकार कुरळ्या केसांच्या स्टाईलनेमुळे चर्चेत आला आहे. त्याची आई शासकीय सेवेत असून, वडील अभियांत्रिकी फॅब्रिकेटर्सच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याची बहीणसुद्धा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. त्याच्या या कुटुंबीयांचा मात्र त्याच्या हेअर स्टाईलला कसलाच विरोध नाही, हे विशेष. गेल्या तीन वर्षांपासून त्याने ही खास हेअर स्टाईल ठेवली आहे. 

एकवीस वर्षीय कैलाशने आपण इतरांहून वेगळे दिसावे, आपली स्वतंत्र ओळख असावी, या उद्देशाने ही हेअर स्टाईल केली आहे. केसांची खास अशी निगा राखण्याचे कामही त्याला करावे लागत आहे. डोक्‍यावर सुमारे फूटभर कुरळ्या केसांचे हे ओझे वाहताना मात्र तो कुणाचीच पर्वा करत नाही. काही जण त्याच्या या स्टाईलकडे पाहून हसतात, काहींना त्याचा हा पोरकटपणाही वाटतो. प्रत्येकाला त्याने काय करावे, याचे जसे स्वातंत्र्य असते, तसे मलाही असल्याने मी ही हेअर स्टाईल केल्याचे तो बिनधास्त सांगतो. मल्याळम भाषेतील एका टीव्ही मालिकेतील कलाकाराची केशरचना याच पद्धतीची आहे. याचा अर्थ त्याचे मी अनुकरण केलेले नाही, अशी कबुलीही तो देतो. 

सेल्फीसाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता 
हेअर स्टाईलमुळे चर्चेत आल्याने कैलाशसमवेत सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असल्याचे दिसत आहेत. तो मात्र गायनात विद्यापीठाला बक्षीस मिळवून द्यावे, यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. 

Web Title: kailash hair style in cultural festival