पोटातील बाळासह अपघातग्रस्त कल्याणी जीवनाची लढाई हारली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

सर्व नातेवाईक, मित्र मंडळींसह समाजातील दानशूरांनी त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत गोळा केली हाेती परंतु त्यापुर्वीच कल्याणी यांचा मृत्यू झाला.

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर खिंडवाडी (ता. सातारा) गावानजीक सोमवारी (ता. 4) सकाळी राज्य परिवहनमहामंडळाची एसटी (क्रमांक एमएच 20 बीएल 3667) ही मुंबईहून कऱ्हाडला निघाली होती. सातारा बस स्थानकात काही काळ थांबल्यानंतर ही एसटी कऱ्हाडच्या दिशेने निघाली. मात्र, काही क्षणातच प्रवाशांवर अपघाताचा प्रसंग ओढवला. या अपघातात जखमी झालेल्या कल्याणी देशमुख यांचा आज (गुरुवार) मृत्य झाला.

महामार्गावरील खिंडवाडीच्या अलीकडे अचानकपणे एसटी चालकाच्या छातीतून कळा येऊ लागल्या. त्यानंतर काही कळायच्या आतच एसटीने दुभाजक ओलांडला. त्यानंतर सातारा बाजूकडे येणारी मार्गिकाही ओलांडली. त्यानंतर ही एसटी थेट सेवारस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली. या दरम्यान एसटीने सातारा बाजूकडे निघालेल्या एका मोटारसायकलला धडक दिली. त्यात मोटारसायकलवरून प्रवास करणारे दोघे जखमी झाले. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. चालकाची स्थिती समजताच सर्वांचाच थरकाप उडाला. 

दरम्यान, घटनेनंतर एसटीचालक व मोटारसायकलवरील दोन्ही जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामधील नांदगाव (ता. सातारा) येथील कल्याणी देशमुख या महिलेचा मृत्यू झाला आहे. कल्याणी या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. पती वैभव यांच्या समवेत सोनोग्राफी करण्यासाठी साताऱ्याला जात असतानाच त्यांना अपघातास सामोरे जावे लागले. दोघांवर उपचार सुरु होते परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना खर्च परवडत नव्हता.

वैभव हे देशमुख कुटुंबातील कर्ता पुरुष आहेत. ते एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांचे आई - वडील मोलमजूरी करतात. त्यांचा पत्नी कल्याणीसह अपघात झाल्याचे समजताच त्यांचे मुंबईचे नातेवाईकांनी साताऱ्यात तातडीने धाव घेतली होती. सर्व नातेवाईक, मित्र मंडळींसह समाजातील दानशूरांनी त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत गोळा करण्यासाठी पूढाकार घेतला. परंतु आज (गुरुवार) उपचारादरम्यान कल्याणी यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत राज्य परिवहन महामंडळाने जखमींना कोणत्याही स्वरुपाची मदत दिली नसल्याची खंत नातेवाईकांनी रुगणालयात व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyani lost the battle of life with a baby in her stomach