विमानतळ विस्तारीकरणाच्या जमीन भूसंपादनास स्थगिती : डॉ. पाटणकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्र्यांच्या निर्णायक बैठकीस अनुसरून कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरण जमीन
भूसंपादनाची अंतिम प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. 

सातारा ः कऱ्हाड विमानतळ विस्ताराविषयी नोव्हेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने हा विस्तार प्रकल्प कमर्शियल दृष्टीने चालू शकणारा नसल्याने तो गुंडाळावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठविल्याचे नमूद केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने घ्यायचा असल्याचे अहवालत म्हटले आहे. त्यामुळे आमच्या चळवळीची भूमिका सिद्ध झाली आहे. सद्यःस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांनी विमानतळ विस्तारीकरणाच्या जमिनीच्या भूसंपादनाची अंतिम प्रक्रियेला स्थगिती दिली असून, आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरण रद्द होईल, असा विश्‍वास श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 
डॉ. पाटणकर म्हणाले, की आज आंदोलनाचा 25 वा दिवस आहे. स्थानिक प्रशासनाने अद्याप मुख्यमंत्री कार्यालयास आंदोलनाबाबतचा अहवाल पाठविला नाही. अखेर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याशी थेट संपर्क साधून येथील परिस्थितीची माहिती दिली, तसेच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाल्यास प्रश्‍नांची सोडवणूक होईल, असे नमूद केले. त्यापाठोपाठ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने गगराणी यांनी प्रत्यक्ष भेटून नेमकेपणाने वस्तुस्थिती दाखवून दिली. जनतेने सहकारी पद्धतीने शेती बागायत करून, अल्पभूधारक असूनही कशी किमान समृद्ध कुटुंबे उभी केली आहेत. विमानतळ विस्तारामुळे ती कशी उद्‌ध्वस्त होणार आहेत हे सप्रमाण दाखवून दिले. गगराणी यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या प्रतिनिधींना बोलावून घेऊन त्यांचा अहवाल मागितला आहे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या निर्णायक बैठकीस अनुसरून भूसंपादनाची अंतिम प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. 
डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, ""यापूर्वी अनेक प्रकल्पांत जमिनी गेल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांना सातारा, कऱ्हाड तालुक्‍यांत नोकऱ्या मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. सुमारे 3200 एकर जमीन घेतल्यास लोक विस्थापित होणार आहेत. त्यामुळेच 99 टक्के लोकांचा जमीन देण्यास विरोध आहे. अशास्त्रीय आणि जनहिताच्या विरोधी धोरणे राबवण्याचे प्रयत्न यापूर्वीही जनतेने रोखले आहेत. या आंदोलनात सुद्धा असेच घडणार हे आता स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जनतेने पुढे आणलेला पुसेगावचा पर्याय स्वीकारण्याचा मुद्दा जनताभिमुख विकास पुढे नेण्यासाठी आहे. त्यासाठी सुद्धा येणाऱ्या बैठकीत पाठपुरावा केला जाईल.'' 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad airport extension land acquisition stopped