नवख्या २० मेहेरबानांचा राबता वाढणार

नवख्या २० मेहेरबानांचा राबता वाढणार

२०११ ला निवडून आलेल्यांचा कार्यकाल संपुष्टात; आजपासून नवी राजकीय इनिंग सुरू 

कऱ्हाड - पालिकेच्या २०११ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाल आज संपुष्टात आला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेले नगराध्यक्षांसह २९ नगरसेवकांची राजकीय इनिंग आज सुरू झाली आहे. मावळत्या ३२ नगरसेवकांपैकी अवघ्या नऊ जणांना विद्यमान नगरसेवकाची बिरूदावली लागणार आहे.

उर्वरित २३ जणांची माजी नगरसेवक म्हणून संबोधले जाणार आहे. त्याशिवाय आजी- माजी म्हणून अनुभव नसणाऱ्या नवख्या २० ‘मेहेरबानां‘चा राबता पालिकेत वाढणार आहे. 

पालिकेची नुकतीच निवडणूक होऊन भाजपच्या रोहिणी शिंदे यांची थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्याशिवाय प्रभागातून नशिब आजमावणाऱ्या १२१ पैकी २९ जणांना जनतेने संधी देताना नगराध्यक्षपद व चार नगरसेवक भाजपच्या पारड्यात टाकले. जनशक्तीकडे बहुमत देताना त्यांचे १६ नगरसेवक निवडून आले. लोकशाहीला अवघ्या सहा जागांवर सामाधान मानावे लागले, तर तीन अपक्षांनी बाजी मारली. नव्याने झालेल्या २९ मेहेरबानांमध्ये विद्यमान नऊ जणांना पुन्हा संधी मिळाली. त्यात जयवंत पाटील, शारदा जाधव, सदाशिव ऊर्फ बाळासाहेब यादव, हणमंत पवार, राजेंद्र माने, स्मिता हुलवान व विजय वाटेगावकर यांचा समावेश आहे. भाजपमध्ये ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांना, तर लोकशाही आघाडीत मोहसिन आंबेकरी यांना पुन्हा संधी मिळाली.

स्वीकृतसह ३२ पैकी उर्वरित २३ जण उद्यापासून माजी नगरसेवक म्हणून ओळखले जाणार आहेत. २०११ ला झालेल्या निवडणुकीतील नगरसेवकांचा कार्यकाल आज संपुष्टात आली. त्यामुळे उद्यापासून (ता.२०) नव्याने निवडून आलेले नगरसेवक शहराचे मेहेरबान म्हणून ओळखले जातील. नव्यामध्येही भाजपच्या विद्या पावसकर या एकमेव माजी नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांना पालिकेच्या कामकाजांचा अनुभव आहे. भाजपमध्ये पावसकर वगळता उर्वरित तिघांमध्ये पावसकर विद्यमान असून, सुहास जगताप व अंजली कुंभार हे नवे चेहरे आहेत. जनशक्तीतील १६ पैकी सात विद्यमान, नऊ जणांना पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून संधी मिळाली आहे.

यात गजेंद्र कांबळे, किरण पाटील, अरुणा पाटील, माया भोसले, आशा मुळे, अर्चना ढेकळे, प्रियांका यादव, महेश कांबळे व सुप्रिया खराडे यांचा समावेश आहे. तीच अवस्था लोकशाहीत सहा पैकी विद्यमान मोहसिन आंबेकरी वगळता निवडून आलेल्यांमध्ये सौरभ पाटील, अनिता पवार, पल्लवी पवार, सुनंदा शिंदे व वैभव हिंगमिरे नवे चेहरे आहेत. तिघा अपक्षांचे चेहरे पालिकेसाठी नवखे आहे. त्यात इंद्रजित गुजर, मिनाज पटवेकर व कश्‍मिरा इंगवले यांचा समावेश आहे. त्यामुळे २९ पैकी नऊ विद्यमान वगळता २० नवखे चेहरे उद्यापासून कऱ्हाडचे नवे मेहेरबान म्हणून ओळखले जाणार, हे निश्‍चित.    

अध्यक्षांसह नवख्यांकडे लक्ष....
नगराध्यक्षपदी रोहिणी शिंदे यांना जनतेतून निवडून दिले असले, तरी त्यांनाही पालिकेच्या कामकाजाचा अनुभव नवा आहे. त्यामुळे नव्या २० मेहेरबानांप्रमाणे अध्यक्षाही पालिकेसाठी नव्या असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीकडे लक्ष लागून राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com