आहार पुरवणाऱ्या महिला मात्र उपाशी 

हेमंत पवार
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

कऱ्हाड - अंगणवाड्यांतील बालकांना आहार शिजवून देण्यासाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात येते. त्या माध्यमातून बचत गटांनाही अर्थार्जनाचे साधन उपलब्ध झाले. मात्र, गेल्या वर्षभरापासून अंगणवाडीच्या आहाराचे बिल बचत गटांना देण्यात आले नाही. सरकारकडून त्यासाठी निधी न आल्याने बिले दिली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, समोर बचत गटांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे बचत गटांच्या आहाराची घडी विस्कटण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे. 

अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना चांगला आहार मिळावा, या हेतूने राज्य सरकारने बालकांना आहार देण्याची योजना सुरू केली. पहिल्यांदा बालकांना अंगणवाडी सेविका व मदतनीस आहार शिजवून देत होत्या. त्यासाठी त्यांना रेशनिंगव्दारे धान्य पुरवले जात असे. मात्र, त्यानंतर सरकारने बचत गटांना चालना देण्यासाठी अंगणवाडीचा आहार बचत गटांनी शिजवून द्यावा असे आदेश काढले. त्यामुळे काही ठिकाणचा अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यांत सध्या बचत गटांव्दारेच आहार शिजवून दिला जातो. त्याव्दारे प्रति विद्यार्थी सहा रुपये बचत गटांना शासनाकडून दिले जातात. त्यामाध्यमातून बचत गटांनाही अर्थार्जनाचे साधन उपलब्ध झाले. मात्र, वर्षभरापासून अंगणवाड्यांच्या आहाराचे बिलच अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे वर्षभर संबंधित बचत गटांच्या महिलांना शिजवून दिलेल्या आहारासाठीचा खर्च डोईजड झालेला आहे. त्यांच्यापुढे यापुढे आहार शिजवून द्यायचा की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण यापूर्वी त्यांनी पदरमोड करून आहार शिजवून दिला आहे. यापुढेही अशीच स्थिती राहिल्यास आर्थिक भुर्दंड सोसायचा कोणी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे अंगणवाड्यांतील बालकांना आहार शिजवून देण्याची बसलेली ही घडी विस्कटण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनाही बचत गटांच्या महिलांना आहार बिलासंदर्भातील उत्तरे देताना नाकीनऊ येत आहे. 

कुपोषितांचा प्रश्न 

अंगणवाड्यांत दाखल झालेल्या बालकांमध्ये कुपोषित बालकांचाही समावेश असतो. त्यांच्यासाठी स्वतंत्र आहार देवून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी अंगणवाड्यांमार्फत प्रयत्न केला जातो. मात्र, गेल्या वर्षभरापासून अंगणवाड्यांसाठी आहार शिजवून देवूनही त्याचे बिले देण्यात आले नाही. त्यामुळे जर बचत गटांना आहार शिजवून देणे बंद केले तर कुपोषित बालकांच्या आहाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. 

बचत गटांचा बंदचा इशारा 

आहार शिजवून देण्याचे बिल तातडीने अदा न केल्यास बचत गटांनीही या आठवड्यापासून आहार शिजवून देणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बालकांच्या आहाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. 

Web Title: karad news anganwadi women