कर्जमाफीत सर्व्हरही देईना साथ!

हेमंत पवार
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी; सर्व्हर स्लो, अर्जही होईनात सेव्ह

कऱ्हाड - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सध्या ऑनलाइन अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, अर्ज भरताना सर्व्हर तांत्रिक अडचण येत असल्याने अर्ज सेव्ह करताना, भरताना शेतकरी वैतागले आहेत. एका अर्जासाठी दिवसभर ताटकळावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एका वेळी अनेक शेतकरी अर्ज भरत असल्याने यंत्रणेवर ताण येत असल्याचे उपनिबंधक कार्यालयाचे म्हणणे आहे.

ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी; सर्व्हर स्लो, अर्जही होईनात सेव्ह

कऱ्हाड - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सध्या ऑनलाइन अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, अर्ज भरताना सर्व्हर तांत्रिक अडचण येत असल्याने अर्ज सेव्ह करताना, भरताना शेतकरी वैतागले आहेत. एका अर्जासाठी दिवसभर ताटकळावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एका वेळी अनेक शेतकरी अर्ज भरत असल्याने यंत्रणेवर ताण येत असल्याचे उपनिबंधक कार्यालयाचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी खलबते झाल्यानंतर राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यामध्ये शासनाने काही नियम व अटी घातल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या शेतकऱ्यांना कर्मजाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा, असे सूचित केले आहे. त्यासाठी शासनाने सेवा केंद्र, सोसायट्या, ग्रामपंचायतीसह अन्य ठिकाणी व्यवस्था केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांनी हा अर्ज भरण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, अर्ज भरताना ऑनलाइन यंत्रणेत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी इंटरनेटला रेंजच नसल्याचे सांगितले जात आहे. 

ज्या ठिकाणी रेंज आहे तेथे गेल्यावर अर्ज भरताना सेव्ह होत नाही, त्याचबरोबर शेतकरी अर्ज भरायला गेल्यावर त्यांना ‘सर्व्हर डाऊन आहे’, ‘स्लो आहे’ यासह अन्य काही तांत्रिक कारणे सांगितले जात आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागलेत. याबाबत शेतकऱ्यांनी उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे सविस्तर अडचणी मांडल्या. एका वेळी अनेक शेतकरी अर्ज भरत असल्याने यंत्रणेवर ताण येत असेल, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. शासनाने या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कर्जमाफीसाठी अनेक शेतकरी ऑनलाइन अर्ज भरत असल्याने सर्व्हरवर ताण येत आहे. यंत्रणेवरील ताण कायम राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. 
- डॉ. महेंद्र चव्हाण, उपनिबंधक, कऱ्हाड

ऑनलाइन अर्ज भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. कर्जमाफी द्यायचीच असेल तर ऑनलाइन अर्ज कशासाठी? शासनाने ऑफलाइन अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू करावी.
- ॲड. शरद पोळ, पंचायत समिती सदस्य, कऱ्हाड

पैसे मोजा अन्‌ भरून घ्या अर्ज

काशीळ - शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. हे ऑनलाइन अर्ज भरण्यास अनेक ठिकाणी ३० ते १०० रुपयांपर्यंत पैसे घेतले जात आहेत. शासनाने मोफत फॉर्म भरून देण्याचा आदेश दिल्यानंतरही पैसे द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यातही दररोज निकष बदलत आहेत. या अटी, शर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. हे अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. त्यासाठी शासनाने ई- सेवा केंद्र, सोसायट्या, ग्रामपंचायतींसह अन्य ठिकाणी व्यवस्था केली आहे. ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी जिल्ह्यात ९३६ केंद्रांची निवड केली आहे. त्यातील काही केंद्रांवर एक अर्ज भरून घेण्यासाठी ३० ते १०० रुपये आकारले जात आहेत. मुळात कर्जमाफीचे अर्ज मोफत भरून घेण्याचा शासनाचा आदेश आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची फी घेतली जाऊ नये, असा आदेश आहे. केंद्र चालकांकडून हा आदेश गुंडाळून ठेवत शेतकऱ्यांकडून सर्रास पैसे घेतले जात आहेत. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाही केली जात नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 
शासनाने घातलेल्या निकषाच्या गाळणीतून पास झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफ होण्यासाठीच्या अर्जासाठी पैसे देण्याची वेळ आली आहे.

कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी सर्वच पात्र शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी प्रशासनाकडून पैसे घेणाऱ्या केंद्र चालकावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कर्जमाफीचा अर्ज भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जाऊ नयेत. अर्ज भरण्यासाठी कोणत्याही केंद्रावर पैसे घेतल्यास त्या केंद्रचालकावर कारवाई केली जाईल. 
- श्‍वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा

Web Title: karad news Delayed server does not support!