'ते' जीवन संपविणार होतेच; पण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे कऱ्हाडमध्ये प्रेमीयुगुलास जीवदान

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे कऱ्हाडमध्ये प्रेमीयुगुलास जीवदान
कऱ्हाड - प्रेमविवाहाला घरातून होणाऱ्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाने येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्येची केलेली तयारी पोलिसांच्या नाकाबंदीतील तपासणीमुळे उघडकीस आली. संबंधितांनी आत्महत्या करत असल्याचे मोबाईल रेकॉर्डिंग करत विषारी औषधाने भरलेले ग्लास समोर ठेवले. मात्र, त्याच वेळी पोलिस तेथे पोचल्याने दोघांचेही प्राण वाचले. दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्या घरातील लोकांना बोलावून आज समुपदेशन केले. कुटुंबीयांनीही त्यांच्या लग्नाला सकारात्मकता दाखवल्याने विवाह बंधनात अडकण्याचा त्यांचा मार्ग आता मोकळा झाला.

कऱ्हाड तालुक्‍यातील एका गावातील हे प्रेमीयुगुल. दोघांच्याही घरातून त्यांच्या प्रेमविवाहाला विरोध होता. त्यामुळे ते काल घरांतून पळाले. कऱ्हाड शहरालगतच्या एका हॉटेलवर खोली घेऊन थांबले. विवाहाला होणाऱ्या विरोधामुळे दोघांनीही आत्महत्येचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रात्री दीडच्या सुमारास सोबत आणलेले कीटकनाशक दोन ग्लासमध्ये पिण्यासाठी ठेवले. आत्महत्या करत असल्याचाबाबत मोबईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. आत्महत्येची पूर्ण तयारी झाली होती. मात्र, त्याच वेळी हॉटेलचा दरवाजा ठोठावला गेला.

तो उघडला तर दारात पोलिस. नाकाबंदीमुळे हॉटेल तपासणीसाठी आलेले फौजदार एम. ए. खान, हवालदार श्री. ओंबासे व कर्मचाऱ्यांनी आत प्रवेश करून त्यांची चौकशी सुरू केली. टेबलावर ठेवलेले ग्लास, त्याच्या शेजारी विषारी कीटकनाशकाचा कागद पडलेला होता. पोलिसांना संशय आला. त्यांचा मोबाईल तपासला, तर आत्महत्या करत असल्याचे रेकॉर्डिंग पाहताच पोलिस चक्रावून गेले. त्यांनी तातडीने दोघांनाही ताब्यात घेतले.

पोलिस ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी संबंधितांच्या घरातील लोकांना बोलावून घेतले. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक श्री. जाधव यांनी पालकांचे समुपदेशन केले. पोलिस वेळीच पोचले नसते, तर कदाचित त्या दोघांचे मृतदेह पाहण्यास मिळाले असते, असेही पोलिसांनी पालकांना सांगितले.

दिवसभराच्या चर्चेनंतर दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी सकारात्मकता दर्शवली.

'नाकाबंदीचे आदेश असल्याने संबंधित हॉटेलवर पोलिस तपासणीसाठी गेले. तेथे वेळीच पोचल्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या दोघांचे जीव वाचवण्यात यश आले.''
- प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक, कऱ्हाड शहर

Web Title: karad news lover life saving