टोल चुकवण्याचा जीवघेणा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कऱ्हाड - तासवडे येथील टोल चुकवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाला पर्याय शहरी व ग्रामीण भागातील रस्त्याने अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. अवघ्या २० किलोमीटरच्या मार्गावरून जाणारी अवजड वाहने त्या भागातील स्थानिकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहेत. अवजड वाहने जाणारा सारा भाग गजबजलेला व नागरी वस्त्यांचा असल्याने ही वाहतूक स्थानिकांच्या जिवावर बेतू शकते. टोल चुकवेगिरी करणाऱ्या वाहनांचे वर्षभरात पन्नासपेक्षा जास्त अपघात, तर त्यात डझनभर लोकांनी जीव गमावल्याची नोंद पोलिसांकडे आहे. अवजड वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे. 

साताऱ्याहून कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या सगळ्याच वाहनांना तासवडे येथे टोल घेतला जातो. तो अवजड वाहनांना किमान २५० च्या आसपास आहे. महामार्गाला पर्यायी मार्ग असलेला शिवडे फाट्यावरून मसूरकडे व तेथून पुन्हा कोपर्डे हवेलीमार्गे शहरातून कोल्हापूर नाक्‍याकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर होत आहे. चुकवलेल्या टोलची रक्कम चालकाच्या खिशात जाते. महामार्गावरून दररोज जाणाऱ्या अवजड वाहनांपैकी किमान १५ टक्के वाहने शिवडे फाट्याहून कऱ्हाडकडे जाणाऱ्या रस्त्याने ये- जा करतात. 

टोल चुकवेगिरीचा हा फंडा आता स्थानिकांच्या जीवावर बेतत आहे. पाच वर्षांहून अधिक काळ अशी वाहतूक सहन करणाऱ्या स्थानिक भागातील नागरिक आता त्याला विरोध करू लागलेत. शासनाने योग्य पर्याय काढला नाही, तर स्थानिक आंदोलन करून वाहतूक बंद पाडतील, अशी स्थिती आहे. अवजड वाहनांमुळे खराब होणाऱ्या २० किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने पाच वर्षांत ५० लाखांची तरतूद केली आहे. मात्र, रस्त्यात सुधारणा झालेली दिसत नाही. 

अपघातग्रस्त ठिकाणे 
कोल्हापूर नाका, दत्त चौक, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय चौक, कृष्णा नाका, कृष्णा कॅनॉल, विद्यानगर, बनवडी फाटा, कोपर्डे हवेली, यशवंतनगर, शिरवडे फाटा, मसूर, कोरेगाव फाटा, शिवडे फाटा

अवजड वाहनांमुळे अपघातांत वाढ
अवजड वाहनांमुळे कोल्हापूर नाक्‍यासह दत्त चौक व कृष्णा कॅनॉल चौक व ग्रामीण भागात वर्षभरात पन्नासपेक्षा अपघात झाले आहेत. अशी नोंद पोलिसांकडे आहे. त्यात किमान १२ लोकांनी जीव गमावले आहेत. कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्या पंचवीसवर आहे. अपघातातील किमान २० मोठी वाहने सापडली आहेत. अन्य वाहने अज्ञात आहेत. पहाटे, रात्री उशिरा अपघातानंतर न थांबताच वाहने तेथून निघून गेल्याची संख्याही अधिक आहे. 

Web Title: karad news The options for National Highway to avoid the toll are the roads in urban and rural areas