कऱ्हाड: शहर व तालुक्यात सुमारे ६५ गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव

सचिन शिंदे 
शनिवार, 22 जुलै 2017

सुमारे ३२ प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात गुंडाच्या चार वेगवेगळ्या टोळ्यांचा समावेश आहे. त्यांची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे

कऱ्हाड - शहर व तालुक्यातील गुंडाच्या चार वेगवेगळ्या टोळ्यांसह सुमारे ६५ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यातील गुंडाच्या टोळ्यांच्या तडीपारीवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक सा. राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिली आहे.

प्रांताधिकारी यांच्याकडे वैयक्तीक तडीपारीचे सुमारे तीस स्वतंत्र प्रस्ताव आहेत. तर गुंडाच्या चार टोळ्यांच्या प्रस्तावर सुमारे दहा जणांचा समावेश आहे. शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंडासह अन्य लोकांचा त्यात समावेश आहे. शिवणकर म्हणाल्या, 'गणेशोत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभुमीवर शांतता रहावी, यासाठी पोलिसांनी भक्कम पावले उचलली आहे. त्याचा एक भाग म्हणून तडीपारीचे प्रस्ताव आहेत. शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी महिनाभरापासून पोलिस उपाधीक्षक कार्यालयाकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू होते. त्याची पुर्तता झाली आहे. सुमारे ३२ प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात गुंडाच्या चार वेगवेगळ्या टोळ्यांचा समावेश आहे. त्यांची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. प्रांताधिकारी यांच्याकडे वैयक्तीक तडीपारीचे प्रस्ताव आहेत. त्यात कलम ५५ व ५६ नुसारच्या सुमारे तीस प्रस्ताव आहेत. त्याचीही सुनावणी सुरू आहे. त्यावरही लवकरच निर्णय अपेक्षीत आहे. त्याशिवाय अजूनही ३५ लोकांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. तेही प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत. त्यावरही गणेशोत्सवापूर्वी निर्णय अपेक्षीत आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्यांसह जुगार अड्डा चालवणाऱ्यांसह काही मटका बुकींचाही तडीपारीच्या प्रस्तावात समावेश आहे. त्याशिवाय वारंवार तीन पानी अड्डा चालणाऱ्यांसह त्या जुगारच्या गुन्ह्यात सहभागी असलेले, मारामारी, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी गुन्ह्यातील लोकांचा तडीपारीच्या प्रस्तावात समावेश आहे'. 

Web Title: Karad News: police