टेलिमेडिसीन यंत्रणा ठरतेय जीवनदायी!

हेमंत पवार
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्‍टरांद्वारे येथील डॉक्‍टरांचे ज्ञान अद्ययावत करण्याचे कामही या यंत्रणेद्वारे सुरू आहे. त्याचा फायदा स्थानिक डॉक्‍टरांना होत आहे. 
- डॉ. प्रकाश शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड

कऱ्हाडात पाच हजार ७२५ रुग्णांना लाभ; ४० किचकट शस्त्रक्रियाही यशस्वी
कऱ्हाड - गंभीर आजाराने ग्रासलेल्या व आर्थिक स्थिती बेताची असलेल्या रुग्णांना येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेली टेलिमेडिसीन यंत्रणा जीवदान देणारी ठरली आहे. गेल्या दहा वर्षांत या यंत्रणेद्वारे २५० रुग्णांना जीवदान देण्यात यश आले आहे. ४० रुग्णांच्या किचकट शस्त्रक्रियाही यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे रुग्णांसाठी टेलिमेडिसीन यंत्रणा जीवदायी ठरताना दिसते.

बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच आर्थिक स्थिती बेताची असल्याने गंभीर आजारी रुग्णांना उपचार करताना अडचण येते. त्यांच्यासाठी शासकीय रुग्णसेवा ही आधार बनली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात केवळ दहा रुपयांचा केसपेपर काढून लाखो रुपयांचे उपचार मोफत केले जातात. सध्या वैद्यकीय क्षेत्रातही आत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून उपचार केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उपजिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसीन यंत्रणा बसवण्यात आली आहे.  एकाचवेळी हजारो मैल अंतरावरील डॉक्‍टर रुग्णांच्या आजाराबाबत एकमेकांशी बोलून त्यांच्यावर उपचार करण्याची कार्यवाही या यंत्रणेद्वारे करत आहेत. त्यामुळे ही यंत्रणा उपयोगी ठरत आहे.

२००८-०९ साली सुरू करण्यात आलेली ही यंत्रणा अनेक रुग्णांसाठी आधार बनली आहे. आतापर्यंत गेल्या दहा वर्षांत संबंधित यंत्रणेव्दारे तीन हजार ५४९ रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयातून तर, दोन हजार १७६ रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयातून तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन उपचार करण्यात आले आहेत. सध्या मुंबई येथील सर जे. जे. हॉस्पिटल, के. ई. एम. हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, इपिलेस्पी फाउंडेशन, पी. सी. ओ. ई. सायन, पुणे येथील बी. जे. मेडिकल (ससून हॉस्पिटल) महाविद्यालय, नागपूर आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर संबंधित रुग्णांवर उपचार करतात.

टेलिमेडिसीनचे फायदे... 
रुग्णांचा वेळ आणि पैसे वाचण्यास मदत
रुग्णालयातच राज्यातील तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला 
सुमारे ८०० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया 
किचकट ४० शस्त्रक्रिया यशस्वी 
२५० रुग्णांना मिळाले जीवदान 

खासगी रुग्णालयांना फायदा 
अलीकडे विविध प्रकारचे आजार वाढल्याने त्यावर शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात. मात्र, ही शस्त्रक्रिया करताना अनेकदा नवीन ज्ञानाची माहिती डॉक्‍टरांना असणे आवश्‍यक असते. खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांशी संपर्क साधून संबंधित रुग्णांच्या आजाराची माहिती दिल्यास त्यांना टेलिमेडिसीन यंत्रणेद्वारे सल्ला आणि मार्गदर्शन देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: karad news satara news telemedicine system