‘टेंभू’च्या पाण्याचे नियोजन यंदाही कागदावरच

हेमंत पवार
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

विसर्जनानंतर कृष्णेचे पाणी कमी झाल्याने मूर्ती उघड्या; सूचना मांडूनही कार्यवाही शून्यच

कऱ्हाड - गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान दरवर्षीप्रमाणे कृष्णा नदीतील पाण्याचे टेंभू योजनेकडून करण्यात येणारे नियोजन यंदाही कागदावरच राहिले. मूर्ती विसर्जनाअगोदर पाणीपातळी कमी करणे आवश्‍यक असतानाही मूर्ती विसर्जनानंतर ती कमी करण्यात आली. त्यामुळे नदीपात्रात विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती उघड्या पडल्या.

विसर्जनानंतर कृष्णेचे पाणी कमी झाल्याने मूर्ती उघड्या; सूचना मांडूनही कार्यवाही शून्यच

कऱ्हाड - गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान दरवर्षीप्रमाणे कृष्णा नदीतील पाण्याचे टेंभू योजनेकडून करण्यात येणारे नियोजन यंदाही कागदावरच राहिले. मूर्ती विसर्जनाअगोदर पाणीपातळी कमी करणे आवश्‍यक असतानाही मूर्ती विसर्जनानंतर ती कमी करण्यात आली. त्यामुळे नदीपात्रात विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती उघड्या पडल्या.

दरवर्षीचे ते विदारक चित्र यंदा पालिकेचे आरोग्य कर्मचारी, एन्व्हायरो फ्रेंड्‌स नेचर क्‍लब, अन्य संस्था, संघटना, नागरिकांच्या तत्परतेने तेवढ्या प्रमाणात दिसले नाही. मात्र, उघड्या पडलेल्या मूर्ती पुन्हा विसर्जित कराव्या लागल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सूचना करूनही टेंभूच्या पाण्याचे नियोजन यंदाही फसल्याचेच स्पष्ट झाले. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे, यासाठी कृष्णा नदीचे पाणी टेंभू येथे अडवून तेथून उचलून ते देण्यात येते. तेथे पाणी अडविल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नदीकाठच्या मळीच्या जमिनीही पाण्याखाली जातात. दुष्काळी तालुक्‍यातील गावांच्या गरजेनुसार टेंभू योजनेच्या प्रशासनाकडून ते पाणी उचलले जाते. त्यानंतर नदीची पाणीपातळी कमी होते. 

दरवर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत शांतता समितीची गणेश मंडळांसोबत बैठक होते. त्यात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून टेंभू योजनेच्या पाण्याचे नियोजन करण्याचा मुद्दा गाजतो. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल,  पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत येथील जयंत बेडेकर यांनी टेंभू योजनेच्या पाण्याचा मुद्दा मांडला होता. त्या वेळी त्यासंदर्भात चर्चाही झाली. मात्र, त्या वेळी टेंभूच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही सूचना मांडली नाही. तीन दिवसांपूर्वी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्या वेळी कृष्णा नदीतील पाण्याची पातळी वाढलेली होती. मात्र, काल अचानक नदीपात्रातील पाणी कमी झाले. त्यामुळे नदीपात्रात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती उघड्या पडल्या. मूर्ती उघड्या पडल्याने दरवर्षीचे प्रीतिसंगम घाटावर विदारक चित्र दिसते. ते यंदा दिसू नये यासाठी पालिकेचे आरोग्य कर्मचारी, एन्व्हायरो फ्रेंड्‌स नेचर क्‍लब, अन्य संस्था, संघटना, नागरिकांच्या तत्परतेने त्या मूर्ती तेथून पुन्हा विसर्जित केल्या.

मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सूचना करूनही टेंभूच्या पाण्याचे नियोजन यंदाही फसल्याचेच स्पष्ट झाले. पाण्याची ठराविक पातळी राखण्यासाठी पाणी अडवावे लागत असल्याचे टेंभूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, पाणी कमी झाल्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नाला जबाबदार कोण? हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
 

आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान 
कृष्णा नदीचे पाणी कमी झाल्याने प्रीतिसंगमासह नदीकाठी विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती उघड्या पडण्यास सुरवात झाली. त्याची माहिती कळल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काल पहाटे पाचपासून रात्री साडेसात वाजेपर्यंत त्या मूर्ती पुन्हा विसर्जित करण्याचे काम केले. 

Web Title: karad news tembhu water scheme management on paper