मंत्री,खासदारांच्या मागे-पुढे करत ते लाटत असत लाखाे रुपये

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दोनवेळा निघालेल्या रॅलीत चोरी माेठी चाेरी झाली हाेती. या चाेरीचा तपास कराड शहर पाेलिसांनी केला आहे.

कऱ्हाड ः खादीची पांढरी कपडे घालुन, ओळख नसतानाही मंत्री, खासदार यांच्या निघालेल्या रॅलीत त्यांच्या मागेपुढे करत चांगली लोक हेरुन त्यांच्या गळातील चेन, पाकीट लांबवणाऱ्या भामट्यांचा पर्दाफार्श कऱ्हाड पोलिसांनी मोठ्या शिताफीने केला. बीड जिल्ह्यातील गांधीनगर परिसरातील तिघांना शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वेशांतर करुन ताब्यात घेतले. संबंधितांकडुन सोनं आणि रोख रक्कम असा दोन लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांनी दिली. 

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीत खादीची पांढरी शुभ्र कपडे घालुन संबंधित चोरटे सहभागी झाले होते. त्यांनी संबंधित रॅलीत मंत्री पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मागेपुढे रहात काही जणांच्या गळ्यातील चेन, काहींची पाकिटे हातचलाखीने लांबवली. त्यासंदर्भात 
शहर पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या होत्या. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस रेकॉर्डवरील चोरटे व अन्य संशयीतांची कसुन चौकशी केली. त्यानंतर अनेक दिवस मेहनत घेवुन रॅलीतील चित्रीकरणाचा अभ्यास केला. त्या चित्रीकरणातुन अनोळखी चेहरे हेरुन संबंधितांचा शोध सुरु केला. त्यासाठी त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुनही राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन संबंधित संशयीतांची माहिती घेतली.

जरुर वाचा - मंत्र्यांच्या मिरवणुकीत चोरटे झाले मालामाल

त्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, हवालदार जयसिंग राजगे, सचिन साळुंखे, संजय जाधव हे संशयीतांच्या शोधासाठी बीडला गेले. तेथे संबंधितांचा शोध त्यांनी वेशांतर करुन घेतला. त्यानंतर संशयीतांना बीड पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने त्यांनी ताब्यात घेतले. संबंधित संशयीतांना पहिल्यांदा चोरी केली नसल्याचे सांगितले. पाेलिसी खाक्या दाखवताच संशयीतांनी चोरलेले सोनं आणि रोख रक्कम गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. 
संबंधित संशयीत हे वृत्तपत्र, सोशल मिडीयाव्दारे माहिती काढुन जेथे रॅली असेल किंवा विजयोत्सव असेल अशा ठिकाणी खादीची पांढरी कपडे घालुन जातात. जे नेते असतील त्यांच्या आसपासच त्यांचा वावर असतो. मंत्री, खासदार यांच्या मागेपुढे करत चांगली लोक हेरुन त्यांच्या गळातील चेन, पाकीट ते लांबवतात अशी त्यांची स्टाईल असते. संबंधित संशयीतांवर अन्य पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल असुन ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिस उपाधिक्षक गुरव यांनी सांगितले.

हेही वाचा -  उदयनराजेंना चीतपट करणारे बाऴासाहेब झाले मंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Police Arrested Theives From Gandhinagar Beed