आधी 70 हजार कोटींचा हिशोब द्या! - उद्धव ठाकरे

आधी 70 हजार कोटींचा हिशोब द्या! - उद्धव ठाकरे

कऱ्हाड - हल्लाबोल आंदोलन करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची लायकी आहे का? अगोदर 70 हजार कोटी ओरबडून खाल्ले आहेत, त्याचा हिशोब द्या आणि मग हल्लाबोल करा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला. सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ जर एकाही शेतकऱ्याला मिळत नसेल, तर सत्तेत राहून मी त्यांची आरती करू का, असा सवाल करत त्यांनी भाजप सरकारवरही तोंडसुख घेतले.

शेतकरी संवाद मेळाव्यात ते आज येथे बोलत होते. खासदार गजानन कीर्तीकर, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शंभूराज देसाई, माजी आमदार दगडू सपकाळ, संपर्क नेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षल कदम, चंद्रकात जाधव आदी उपस्थित होते.

मी जेथे जातोय, तेथे मला शेतकऱ्यांच्या व्यथा अनुभवायला मिळत आहेत, असे सांगून श्री. ठाकरे म्हणाले, 'कॉंग्रेसचा नाकर्ता कारभार बघितल्यावर एक आशेचा किरण म्हणून जनतेने तुम्हाला मतदान केले. मात्र, तीन वर्षांनंतर कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असे म्हणण्याची वेळ येते याला दुर्दैवच म्हणावे लागेल. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील ही दोन्ही मोठी माणसे. साताऱ्याच्या या मातीने त्यांच्या रूपाने देशाला नेतृत्व दिले. काल मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाणांसारखे सृजनशील राजकारण करू असे सांगितले. मात्र, राजकारणासाठी पक्ष मोठा झाला पाहिजे, असे त्यांचे वागणे म्हणजे सृजनशीलता नव्हे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने काल हल्लाबोल आंदोलन केले. ते करण्याची त्यांची लायकी आहे का? शेतकऱ्यांचे कैवारी असता तर जनतेने सत्तेवरून चालते व्हा, असे तुम्हाला सांगितलेच नसते. अगोदर 70 हजार कोटींचा हिशोब द्या. खरे तर हल्ला बोलण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे, त्यांना नागवणाऱ्यांना तो नाही. गेल्या वर्षी बारामतीत पंतप्रधानांनी "पवार साहेबांचे बोट धरून मी राजकारणात आलो,' असे म्हटले होते. नंतर या राजकारणाचा खुलासा झाला. जे बोलले ते केले नाही म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता गेली. त्याच पावलावर पाऊल टाकून जर हे सरकार चालणार असेल, तर सत्ता गेल्याशिवाय राहणार नाही.''

ते म्हणाले, 'सत्तेत राहूनही मित्रपक्षावर टीका करण्याचे नवीन राजकारण उद्धव ठाकरे करताहेत, अशी टीका पवारसाहेब माझ्यावर करीत आहेत. मात्र, मी त्यांच्याकडून राजकारण शिकू इच्छित नाही. तुम्ही ते मोदींना जरूर शिकवा. माझे एकमेव गुरू माझे वडील बाळासाहेबच आहेत. स्वतःच्याच पक्षात राहून स्वतःच्या नेत्याच्या पाठीत वार करून मुख्यमंत्रिपदी बसणारे तुम्ही माझ्यावर टीका कशी करू शकता.''

उद्धव ठाकरे म्हणाले...
- आजही विजेची 57 हजार कनेक्‍शन पेंडिंग
- शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन सरकारला ताकद दाखवावी
- मल्ल्या मजा करतोय आणि शेतकरी आत्महत्या
- मी नाही लाभार्थी, अशी जाहिरात करावी
- गुजरात निवडणुकीनंतर जीएसटी वाढेल
- शिवसेनेचा नेता मुख्यमंत्रिपदी बसवणारच
- संपूर्ण कर्जमाफीची मागणी सोडणार नाही

ओंबळेंची आठवण
मुंबईमध्ये 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना प्रथम अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री. ठाकरे म्हणाले, "26 नोव्हेंबरला जे घडले, त्याने अंगावर काटा उभा राहतो. तुकाराम ओंबळे यांनी मृत्यू समोर येताना दिसतोय, तरी त्याला मिठी मारण्याचे शौर्य दाखवले.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com