कारखेलचे शिवार जलसंधारणाने हिरवेगार 

रूपेश कदम
शनिवार, 5 मे 2018

मलवडी- माणमधील कारखेल गाव हे सततच्या दुष्काळाने पिचलेले. पण, गावकऱ्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांना निसर्गाने साथ दिली अन्‌ इथल्या ओसाड माळारानाचे हिरवेगार शिवार झाले. 

मलवडी- माणमधील कारखेल गाव हे सततच्या दुष्काळाने पिचलेले. पण, गावकऱ्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांना निसर्गाने साथ दिली अन्‌ इथल्या ओसाड माळारानाचे हिरवेगार शिवार झाले. 

दुष्काळाशी झगडून परिस्थितीला शरण गेलेली इथली माणसं मुंबईच्या दिशेने गेलेली. वीर संताजी घोरपडे यांच्या नावानं इतिहासाशी नाळ जोडलेली. पण, दुष्काळ इतिहासजमा करणे काही शक्‍य होत नव्हते. अशातच 2017 मध्ये जलसंधारणाच्या चळवळीने माणमध्ये जोम धरलेला. गावकरी, मुंबईकर, सामाजिक संस्था, मान्यवर मंडळींच्या माध्यमातून गावात जलसंधारणाचे चांगले काम झाले. या कामाला निसर्गानेही भरभरून साथ दिली. जिथे काम झाले, त्या भागात दमदार पाऊस पडला. त्याचा परिणाम असा झाला की, त्या भागातील 70 पेक्षा जास्त विहिरी एकाच पावसात तुडुंब भरल्या. लोकांच्या डोळ्यात पाणी तरळले. आपल्या घामाचे चीज झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते. नेहमी टॅंकरच्या मागे धावणाऱ्या या गावात यंदा मे उजाडला तरी टॅंकर लागला नाही. ओसाड माळरान उन्हाळ्यातही हिरवेगार दिसत आहे. शंभर एकर भूईमुगाचे पीक उन्हाळ्यातही चांगले आले. प्रत्येकाच्या शेतात जनावरांसाठी हिरवा चारा घेण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी कलिंगड, मिरची, काकडी, वांगी अशी पिकेही घेतली आहेत. यंदाही जलसंधारणाचे चांगले काम सुरू आहे. मागील वर्षी राहिलेले काम पूर्ण करून संपूर्ण गाव कायमचे पाणीदार करण्याचा निर्धार कारखेलच्या ग्रामस्थांनी केला आहे. 

""जलसंधारणाची मागील वर्षी अपूर्ण राहिलेली कामे यंदा पूर्ण करून बागायती गाव म्हणून गावाची ओळख बवनिण्याचा आमचा प्रयत्न आहे.'' 
-रमेश गायकवाड, उपसरपंच, कारखेल 

Web Title: karkhel village green with water conservation