महाराष्ट्रातील नेत्यांची जयंती येथे का..?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

नेहमीप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंचा पुष्पहार घातलेला फोटो चौकात ठेवला. पण, पोलिसांनी आक्षेप घेतला. काही पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन महाराष्ट्रातील नेतेमंडळीचा बेळगावशी काय संबंध, अशी विचारणा केली.

बेळगाव - कर्नाटक सरकारने यंदापासून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याची प्रथा पाडली आहे. असे असताना पोलिसांनी विरोधी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांची जयंती बेळगावात कशाला साजरी करता, असा सवाल पोलिसांनी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना करून वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे, मराठी भाषिकांतून संताप व्यक्‍त होत आहे. 

कर्नाटक पोलिसांची अजब भूमिका

शहापूरमधील बॅ. नाथ. पै चौकात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने गुरुवारी (ता. २३) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली. कार्यक्रम झाल्यानंतर कार्यकर्ते निघून गेले. परंतु, नेहमीप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंचा पुष्पहार घातलेला फोटो चौकात ठेवला. पण, पोलिसांनी आक्षेप घेतला. काही पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन महाराष्ट्रातील नेतेमंडळीचा बेळगावशी काय संबंध, अशी विचारणा केली. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांची बेळगावला का जयंती साजरी करता? यापुढे जयंती साजरी करु नका, अशी सूचनाही केली. बाळासाहेब ठाकरे हे फक्‍त महाराष्ट्राचे किंवा मराठी भाषिकांचे नाहीत तर संपूर्ण देशाचे आहेत. त्यांना फक्‍त महाराष्ट्राचे समजू नका, असे सांगितले. तरीही पोलिसांनी कार्यकर्त्यांबरोबर हुज्जत घालून शहरातील परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत फोटो हटविण्याची सूचना केली. तसेच कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते, याचीही माहिती घेतली.

वाचा - बेळगावात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी....

सीमावासीयांत बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आत्मीयता

सीमाप्रश्‍नी शिवसेनाप्रमुखांचे मोठे योगदान आहे. बेळगावकरांना त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. तसेच महाजन अहवाल गाडण्यासाठी शिवसेनेने १९६९ मध्ये ६७ हुतात्मे दिले आहेत. त्यामुळे, सीमावासीयांत ठाकरे यांच्याबाबत नेहमीच आत्मीयता असून जयंती साजरी करु नका असे सांगणे मूर्खपणा असल्याचे मत मराठी भाषिकांतून व्यक्‍त होत आहे. कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री सदानंदगौडा यांनी राज्यात शिवजयंती शासकीय स्तरावर करण्याचा निर्णय घेतला. सर एम. विश्‍वेश्‍वरय्या यांची जयंती महाराष्ट्रात साजरी केली जाते. त्यामुळे, महान व्यक्‍तिमत्त्वांना राज्यांच्या सीमांमध्ये अडकवू नये, अशी अपेक्षा केली जात आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केल्यानंतर घराकडे येऊन महाराष्ट्रातील नेत्यांची जयंती का साजरी करता, असा प्रश्‍न पोलिसांकडून उपस्थित झाला. यावरुन प्रशासनाची दडपशाही दिसून येते. बाळासाहेब ठाकरे यांनी सीमावासीयांना नेहमीच पाठबळ दिले आहे. ते आमचे प्रेरणास्थान आहेत.
- श्रीकांत कदम, सचिव, म. ए. युवा समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karnataka Police questioned why they celebrate the birth anniversary of the leaders of Maharashtra in Belgaum The committee workers