बेळगावात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Preparations for Chief Minister's visit to Belgaum marathi news

मुख्यमंत्री २९ जानेवारीस बेळगावला येणार आहेत. त्यांचा हा दौरा आधीच ठरला असला तरी अद्याप निश्‍चित झालेला नाही. दोन दिवसांत दौऱ्याबाबत निश्‍चित माहिती दिली जाणार आहे.

बेळगावात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी....

बेळगाव - मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. २३) जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासक डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. महापालिकेकडून शहरात सुरु असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या कामांची पाहणी त्यांनी केली. याशिवाय स्मार्ट सिटी योजनेतील कामांची पाहणीही केली. 
स्मार्ट सिटी योजनेतील कमांड व कंट्रोल सेंटरचे काम पूर्ण झाले आहे. त्या सेंटरचे उद्‌घाटन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांनी विश्‍वेश्‍वरय्यानगरमधील कमांड व कंट्रोल सेंटरची पाहणी केली. शंभर कोटी निधीतून बांधलेल्या अशोकनगरमधील जलतरण तलाव व व्यायामशाळेचे उद्‌घाटन अद्याप झालेले नाही. शहरात काही समुदाय भवनांचे बांधकाम केले आहे. त्यांचेही लोकार्पण प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात उद्‌घाटन कार्यक्रम आटोपून घेण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे, कार्यक्रमाच्या आधी त्या कामांची नेमकी स्थिती काय आहे, याची पाहणी करण्याचा निर्णय डॉ. बोमनहळ्ळी यांनी घेतला. 

वाचा - प्रखर हेडलाईटच देतेय अपघातांना निमंत्रण....

जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध विकासकामांची पाहणी

मुख्यमंत्री २९ जानेवारीस बेळगावला येणार आहेत. त्यांचा हा दौरा आधीच ठरला असला तरी अद्याप निश्‍चित झालेला नाही. दोन दिवसांत दौऱ्याबाबत निश्‍चित माहिती दिली जाणार आहे. पण, मुख्यमंत्री बेळगावला आलेच तर महापालिका व स्मार्ट सिटी योजनेतील काही कामांचे उद्‌घाटन करणे, काही कामांचा नव्याने प्रारंभ करणे असे जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन आहे. स्मार्ट सिटी योजनेतून साडेसात कोटी रुपये खर्चून किल्ला तलावाची सुधारणा केली जाणार आहे. त्याचाही नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाढविला जाईल. त्यामुळे, किल्ला तलावाची पाहणीही गुरुवारी करण्यात आली. माळमारुतीमध्ये बांधलेले रुग्णालय, स्मार्ट सिटी योजनेतील केपीटीसीएल रोडवरील पहिला स्मार्ट रोड आदींची पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त के. एच. जगदीश, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक शशीधर कुरेर व अभियंते 
उपस्थित होते.