रेश्‍माच्या खुनात आरोपी न करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी घेतली लाच 

Solapur
Solapur

सोलापूर : विजयपुरातील कॉंग्रेस नेत्या रेश्‍मा पडेकनूर खुन प्रकरणात सोलापुरातील कार्यकर्ते समीउल्लाह शेख यांना आरोपी न करण्यासाठी एक लाखांची लाच घेणाऱ्या कर्नाटकातील पोलीस उपअधिक्षकासह तिघांवर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री कर्नाटकातील एका पोलिस हवालदारासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. 

कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील बागेवाडी उपविभागाचा पोलिस उपअधीक्षक महेश्वर गौड पाटील, पोलीस हवालदार मल्लीकार्जुन शिवया पुजारी (वय 35, रा. गोलघूमट पोलीस वसाहत, विजयपूर), खाजगी व्यक्ती रियाज खासिमसाहब कोकटनूर (वय 34, रा. जलानगर, विजयपूर) अशी लाच प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून एसीबीने हवालदार पुजारी आणि त्याचा सहकारी कोकटनूर यास अटक केली आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात ही घटना घडली. 

17 मे 2019 रोजी सकाळी विजयपूरजवळ कोलार गावात पुलाखाली रेश्‍मा पडेकनूरचा मृतदेह आढळला होता. गंभीर मारहाण करून मृतदेह टाकण्यात आल्याचे दिसून आले होते. या प्रकरणात सोलापुरातील एमआयएम पक्षाचा शहराध्यक्ष तथा नगरसेवक तौफिक शेखसह पाचजणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पैशाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात तौफिक व त्याचा साथीदार कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहेत. 

रेश्‍मा व तौफिक यांच्यातील वाद मिटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समीउल्लाह शेख यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली होती. रेश्‍मा आणि समीउल्लाह या दोघांतील फोनवरील संवादाच्या ऑडीओ क्‍लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी समीउल्लाह यांच्याकडे लाचेची मागणी केली. कर्नाटक पोलिसांनी आधी पाच लाख, नंतर साडेतीन लाख मागितले. तडजोडीनंतर दीड लाख रुपये देण्याचे ठरले. 

याबाबत शेख यांनी सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेण्यासाठी हवालदार पुजारी आणि त्याचा साथीदार कोकटनूर हे दोघे बुधवारी रात्री सोलापुरात आले. हवालदार पुजारी याने पोलिस उपअधीक्षक पाटील याच्याशी समीउल्लाह यांचे फोनवरून बोलणे करून दिले. पाटीलच्या सांगण्यावरून पुजारी आणि कोकटनूर या दोघांकडे एक लाख रुपये दिले. सात रस्ता परिसरात सापळा लावून बसलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्विकारताना दोघांना रंगेहात पकडले.

सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजितकुमार जाधव, पोलिस निरीक्षक कविता मुसळे, जगदीश भोपळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग सोलनकर, निलकंठ जाधवर, हवालदार पवार, बिराजदार, बाणेवाले, पोलिस नाईक अर्चना स्वामी, पोलिस शिपाई निलेश शिरूर, सिध्दराम देशमुख, उमेश पवार, प्रफुल्ल जानराव, चालक शाम सुरवसे यांच्या पथकाने ही कामगिरी बजाविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com