कासेगावातील घटना : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांवर खुनी हल्ला

विजय लोहार
Friday, 4 December 2020

कासेगाव येथे जमिनीच्या वादातून झालेल्या खुनी हल्ल्यात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले.

नेर्ले (जि. सांगली ) ः कासेगाव येथे जमिनीच्या वादातून झालेल्या खुनी हल्ल्यात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. अभिजित आप्पासाहेब माळी (वय 44) व त्याचा भाऊ रणजित आप्पासाहेब माळी (वय 30, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत.

हल्लेखोरांनी या दोघांना घराबाहेर बोलावून धारधार हत्यारे, लोखंडी रॉड व काठीने हल्ला चढवला. यात अभिजित व रणजितच्या डोके, हात-पायाला गंभीर दुखापत झाली. मंगळवारी (ता. 1) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हणमंत बंडगर, महेश तानाजी रासकर, दत्ता आडके (सर्व रा. कासेगाव) या संशयित हल्लेखोरांवर कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित पसार झाले आहेत. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार अभिजित माळी घरी असताना हणमंत बंडगर याने घरातून बाहेर बोलावून थोडे काम आहे म्हणून बोळात बोलवून घेतले. तेथे गेल्यावर हणमंतनी मारहाण सुरू केली. तर महेश रासकरने त्याच्याकडील धारदार हत्याराने डोक्‍यात मारले. दत्ता आडकेने लोखंडी रॉडने दोन्ही हात व पायावर मारहाण केली. बंडगरने काठीने हातापायावर मारून जखमा केल्या.

अभिजितने तक्रारीत म्हटले आहे, की "तुला आता जिवंतच ठेवत नाही. तुला लय जमीन पाहिजे काय ?' असे म्हणत जबर मारहाण केली. तिघांच्या तावडीतून सोडवण्यासाठी रणजित माळी आला. त्यालादेखील महेश रासकरने धारदार हत्याराने डोक्‍यात पुढील बाजूस मारहाण केली. दत्ता आडकेने लोखंडी रॉडने गंभीर जखमी केले. 

खाशाबा माळी भांडणाचा आवाज ऐकून आले असता हणमंत बंडगर, महेश रासकर, दत्ता आडके तिघेही पळून गेले. अभिजित व रणजितला गंभीर दुखापत झाल्यामुळे खासगी दवाखान्यात प्रथम उपचार करून कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. रणजित जबर मार लागल्याने गंभीर आहे. 
हल्लेखोरांचे विरोधात कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयित हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At Kasegaon Murder attack on brothers over land dispute