काष्टी सेवा संस्थेने थोपाटले नागवडे कारखान्याविरुद्ध दंड 

kashti society taken aggressive stand against Nagawade factory
kashti society taken aggressive stand against Nagawade factory

श्रीगोंदे : देशात नावलौकिक मिळविलेल्या काष्टी सेवा संस्थेला नागवडे कारखान्याने "ब' वर्ग सभासदांच्या यादीतून वगळले आहे. त्यांचा प्रतिनिधी वार्षिक सभेला उपस्थित नसल्याचे कारण देत, संस्थेला मतदानापासून वंचित ठेवले जात आहे. त्याविरोधात आता सेवा संस्थेने कारखान्याविरोधात दंड थोपाटले आहेत. दोन लाखांची शेअर्स रक्कम परत करा; अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा देणारे पत्र काष्टी सेवा संस्थेने नागवडे कारखाना प्रशासनाला दिले आहे. 

काष्टी सेवा संस्था देशात गौरवलेली आहे. संस्थेने 10 वर्षांपूर्वीच राज्यातील सहकार खात्याचा प्रतिष्ठेचा "सहकारमहर्षी' किताब मिळविला. सतत "अ' ऑडिट वर्गात असणाऱ्या सेवा संस्थेला नागवडे कारखान्याने चुकीचे कारण देत, "ब' वर्ग सभासदांच्या यादीतून वगळल्याचा आरोप होत आहे. कारखान्याच्या पाच वर्षांतील एकाही वार्षिक सभेला काष्टी सेवा संस्थेचा प्रतिनिधी उपस्थिती नव्हता, असे कारण देत यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या संचालक मंडळाने संस्थेचे मार्गदर्शक भगवानराव पाचपुते यांच्या आदेशावरून कारखान्याला आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कारखान्याविरुद्ध कायदेशीर कारवाई

संस्थेचे अध्यक्ष ऍड. विठ्ठल काकडे म्हणाले, की माझ्यासह संस्था मार्गदर्शक भगवानराव पाचपुते कारखान्याच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहून भाषणातून सहकार, कारखानदारी, पाणीप्रश्न यावर मते व्यक्त केलेली आहेत. गैरहजर सभासदांची रजा मंजूर करण्याचा आपण मांडलेला ठराव कारखाना प्रशासनाने टिंगलवारी नेला होता. कारखाना प्रशासन चुकीच्या पद्धतीने वागत असून, त्यामुळेच काष्टी संस्थेने कारखान्याकडे सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याकडे असणारे वीस शेअर्सचे दोन लाख रुपये परत मागितले असून, ते न दिल्यास कारखान्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास संस्था मागे-पुढे पाहणार नाही. 

वादाचा चेंडू जाणार विखेंच्या कोर्टात

काष्टी सेवा संस्था व नागवडे कारखाना यांच्यातील वाद पेटण्याची चिन्हे आहेत. भगवानराव पाचपुते, ऍड. काकडे व त्यांचे समर्थक विखे पाटील यांचे नेतृत्व मानतात. नागवडे यांनी पुन्हा एकदा थोरात गटाशी जुळवून घेण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे या वादाला हवा द्यायची की विझवायचा याचा फैसला बहुतेक विखे पाटील यांच्या इशाऱ्यावर अवलंबून असल्याचे बोलले जाते. 

प्रादेशिक सहसंचालकाकडे अपील करा

काष्टी सेवा संस्थेचे पत्र मिळाले आहे. मात्र, आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने याबाबत त्यांना प्रादेशिक सहसंचालक नगर यांच्याकडे रीतसर अपील करावे लागेल. तसे त्यांना सांगण्यात आले आहे. 
- रमाकांत नाईक, कार्यकारी संचालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com