माझा मतदार देशभर, त्यांना हवे विमानतळ; अनिलभाऊंनी दिले कवलापूर विमानतळाच्या लढ्याला बळ

कवलापूर विमानतळासंदर्भातील कागदपत्रे मला पाठवा. मी उद्या उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटणार आहे; अगदीच गरज भासल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विषय सांगेन. सारा भारत माझा मतदारसंघ आहे.
 kavlapur airport contribution of anil babar uday samant cm eknath shinde politics
kavlapur airport contribution of anil babar uday samant cm eknath shinde politicsSakal

‘‘कवलापूर विमानतळासंदर्भातील कागदपत्रे मला पाठवा. मी उद्या उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटणार आहे; अगदीच गरज भासल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विषय सांगेन. सारा भारत माझा मतदारसंघ आहे.

देशभर खानापूरचे गलई व्यावसायिक आहेत. त्यांच्यासाठी कवलापूर विमानतळ गरजेचे आणि फायद्याचे आहे. मी स्वतः लक्ष घालेन...’’ आमदार अनिल बाबर यांनी हे शब्द खरे करून दाखवले.

विमानतळाच्या जागेचा ‘बाजार’ होण्यापासून वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आणि सामंतांकडून विमानतळाला तत्त्वतः मान्यता मिळवली. राजकीय फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाऊन ते विचार करायचे. राजकारणातील हा दुर्मिळ गुण असलेल्या नेत्याची अकाली ‘एक्झिट’ चटका लावणारी आहे.

- अजित झळके

अनिलभाऊंनी सन २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. ते आमदार झाले. भाजपसोबत शिवसेना सत्तेत आली. अनिलभाऊंसोबत एका भेटीत त्यांना म्हटले, ‘‘राष्ट्रवादीत होता, तेव्हा बलाढ्य नेत्यांच्या गर्दीत बाजूला राहिला.

आता शिवसेनेत जिल्ह्याचे नेते व्हायची संधी आहे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘आपण तसल्या भानगडीत पडायचं नाही. माझा मतदारसंघ दुष्काळी आहे. साहजिकच लोकांच्या समस्यांचा डोंगर मोठा आहे. त्यांच्यासाठी काम करता आलं, हे तेवढं खूप आहे. त्यासाठीच वेळ कमी पडतोय. जिल्ह्याचे नेते व्हायची आपली काय हौस नाही.’’

कवलापूर विमानतळाचा विषय पुढे आल्यानंतर मात्र अनिलभाऊंनी स्वतःहून फोन केला. हा विषय तसा मिरज मतदारसंघातील आणि सांगली शहराजवळचा; पण अनिलभाऊ दूरदृष्टीचे नेते. कवलापूरचे विमानतळ जिल्ह्यासाठी किती उपयुक्त ठरेल, याची पक्की मांडणी त्यांनी केली.

प्रवासी वाहतुकीसाठी म्हणाल तर देशभरात सांगली जिल्ह्यातील लोक आहेत. त्यांचा सतत विमानप्रवास होत असतो. त्यापलीकडे जाऊन द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला शेती सांगलीइतकी समृद्ध कुठेच नाही.

हा शेतीमाल जगाच्या बाजारात पाठवायला कार्गो विमानतळ झाल्यास फायदाच होईल, असा विषय त्यांनी रेटला. विमानतळ कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, नितीन चव्हाण, प्रशांत भोसले यांनी विट्यात त्यांची भेट घेतली.

एकत्रित काम करू आणि विमानतळ मंजूर करून घेऊ, असा निर्धार केला गेला. काही दिवसांत मुंबईत बैठक झाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अनिल बाबर यांचा प्रस्ताव मान्य करत विमानतळाची जागा औद्योगिक विकास महामंडळाकडून विमान प्राधिकरणाकडे वर्ग करण्यास मान्यता दिली.

कोयना धरणासंदर्भात अभ्यास अपूर्ण राहिला

या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने कोयना धरणातील पाणी वाटपात ११ टक्क्यांची कपात करावी लागली. आमदार अनिल बाबर यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलीच; मात्र विद्युतनिर्मितीचे पाणी समुद्राला जाऊन मिळते आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही, हे त्यांना खटकत होते.

हे पाणी काही मार्गाने सिंचनासाठी वळवता येईल का, याबाबत ते विचार करत होते. त्यावर नक्कीच अभ्यास केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी ‘सकाळ’कडे मांडली होती. तो अभ्यास आता अपूर्णच राहिला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com