सर्व सभासदांना रुपे कार्ड देणार - आमदार हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा बॅंकेचे ग्राहक इतर ठिकाणी जाऊ नयेत, यासाठी सर्व सभासद व ग्राहकांना रुपे कार्डचे वाटप केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी आज दिली. मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सांस्कृतिक भवन येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून पॉस मशीन सुविधा शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. 

कोल्हापूर - जिल्हा बॅंकेचे ग्राहक इतर ठिकाणी जाऊ नयेत, यासाठी सर्व सभासद व ग्राहकांना रुपे कार्डचे वाटप केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी आज दिली. मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सांस्कृतिक भवन येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून पॉस मशीन सुविधा शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, ""सर्वच बॅंका कॅशलेस होत आहेत. जिल्हा बॅंकाही यापासून दूर राहणार नाहीत. राज्यात सहकारी बॅंकांमधील पॉस मशीन सर्वात आधी कोल्हापूर जिल्हा बॅंकेने सुरू केले आहे. हे मशीन दुकान, मॉल्स, बचत गट, पेट्रोल पंप, हॉटेल्स येथे वापरता येणार आहे. कॅशलेस व्यवहार वाढवण्यासाठी प्रत्येक बॅंकेने पुढाकार घ्यावा, असे सरकारचे धोरण आहे. याच धोरणानुसार जिल्हा बॅंकही कॅशलेसकडे वाटचाल करत आहे. मार्चअखेर जिल्हा बॅंकेच्या सर्व खातेदारांना रुपे कार्ड वाटप करण्याचा प्रयत्न राहील. 

बॅंकेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण म्हणाले, पॉस मशीनद्वारे व्यापारी, ग्राहक, बचत गटांसह इतरांचे व्यवहार सुरळीत होणार आहे. नोटाबंदीनंतर बॅंकेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही बॅंकेने कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल करून राज्यात चांगला पायंडा पाडला आहे. पॉस मशीनचे प्रात्यक्षिकही या वेळी दाखविण्यात आले. तत्पूर्वी हेमल कोठारी यांनी एक्‍साईड विमा कंपनीबाबत माहिती दिली. तसेच विमा करणे कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. दरम्यान, बॅंकेचे अधिकाऱ्यांना व 2 ते 4 लाख विमा व्यवसाय केलेल्या शाखाधिकाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. संचालक भैया माने, अशोक पाटील, उदयानी साळुंखे, असिफ फरास आदी उपस्थित होते. जी. एम. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. गजानन मुळीक यांनी आभार मानले. 

नियोजन चुकलेच 
पंतप्रधानांनी नोटाबंदी करताना जास्त नोटांची आणि मशीनची सोय केली नाही. त्यामुळे नोट टंचाईप्रमाणे मशीन टंचाईही जाणवत आहे. पॉस मशीनची मागणी केल्यानंतर ती प्रत्यक्षात मिळायला वेळ लागतो. तरीही बॅंका कॅशलेस करा म्हणून सांगितले जात आहे. पंतप्रधानांचे हे नियोजन जरा चुकलेच, असे मुश्रीफ यांनी सांगितले. 

लोक कर्जाची परतफेड करणार नाहीत 
परदेशात मोबाइलवरून कर्जाची मागणी केल्यानंतर पाच मिनिटांत लाखो रुपयांचे कर्ज दिले जाते. हे जरी खरे असले तरी येथे अशी कर्ज द्यायला सुरवात केल्यास लोक कोट्यवधीचे कर्ज घेतील, पण परतफेड करणार नाहीत. त्यामुळे येथे असा प्रयोग करायला अजून बराच कालावधी जावा लागणार असल्याचे मुश्रीफ यांनी नमूद करताच एकच हशा पिकला. 

Web Title: KDC Bank Paws distribution machine