
कॉंग्रेस एकत्र आल्यास काय करू शकते हे सांगली महापालिकेतील सत्तांतराने राज्याला दाखवून दिले आहे. मात्र जिल्ह्यात कॉंग्रेस एकसंध ठेवा. गट तट केल्यास कारवाई करू, अशा शब्दात आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जिल्ह्यातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
सांगली : कॉंग्रेस एकत्र आल्यास काय करू शकते हे सांगली महापालिकेतील सत्तांतराने राज्याला दाखवून दिले आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देऊ. मात्र जिल्ह्यात कॉंग्रेस एकसंध ठेवा. गट तट केल्यास कारवाई करू, अशा शब्दात आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जिल्ह्यातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज एकत्रितपणे मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते नाना पटोले यांचा जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर महापालिकेत उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचा श्री. पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जतचे आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्री पाटील, विशाल पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, शहर जिल्हा सरचिजटणीस अभिजित भोसले, तसेच महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, शहर आणि तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष उपस्थित होते.
श्री. पटोले यांनी तब्बल तीन तास वेळ देत या सर्व नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याची संधी दिली. त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ""जिल्ह्यात कॉंग्रेसची भक्कम बांधणी करू. गट तट करू नका. प्रदेशाध्यक्ष आणि ब्लॉक कमिटी अध्यक्ष यांच्यात दूरी राहणार नाही असे काम करू. बूथ स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांची बांधणी करू. लवकरच मी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. तेथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना वेळ देऊन संघटना बाधणार आहे.
ते म्हणाले,""कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना काम करताना कुणी दबाव टाकल्यास त्यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जाईल. मात्र पक्षात गटातटाचे राजकारण केल्यास कारवाई करू. पक्षात सगळ्यांना न्याय दिला जाईल. कॉंग्रेस एकत्र आल्यास काय करू शकते हे सांगलीने राज्यात दाखवून दिले आहे. कॉंग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकजूटपणे काम करा. यापुढचा खासदार कॉंग्रेसचाच असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.''
सातजण कॉंग्रेसमध्ये
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष महावीर पाटील (नांद्रे), नेमिनाथ बिरनाळे, अरविंद जैनापुरे, लक्ष्मण मोरे, सचिन पाटील, पंकज बिरनाळे, भाजपचे सरचिटणीस सुलेमान मुजावर यांनी पटोलेंच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
संपादन : युवराज यादव