केजरीवाल पॅटर्न राबवावा लागेल; भाजप खासदार संजयकाका पाटील यांची भूमिका 

अजित झळके
Monday, 10 August 2020

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येने जवळपास पाच हजार रुग्णांचा टप्पा पार केला आहे. दर दहा दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. या साऱ्यावर नियंत्रण ठेवण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सोबतच त्यांनी सांगलीत दिल्ली सरकारचा केजरीवाल पॅटर्न राबवावा लागेल, असे सांगत दिल्ली सरकारच्या कोरोनाविरोधी कामाचे कौतुक केले. 

सांगली ः जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येने जवळपास पाच हजार रुग्णांचा टप्पा पार केला आहे. दर दहा दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. या साऱ्यावर नियंत्रण ठेवण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सोबतच त्यांनी सांगलीत दिल्ली सरकारचा केजरीवाल पॅटर्न राबवावा लागेल, असे सांगत दिल्ली सरकारच्या कोरोनाविरोधी कामाचे कौतुक केले. 

सांगलीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या 2200 हून अधिक आहे. त्यात रोज दोनशेहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. रुग्णालयांची क्षमता संपत आली आहे. नवे रुग्णालय उभे करा, कॉटची संख्या वाढवा, ऑक्‍सिजन पुरवठा वाढवा, अशा मागणी येत आहेत, मात्र यंत्रणा गतीने हालचाल करताना दिसत नसल्याने खासदार पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसह निष्क्रीय, अपयशी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली. 

त्यावेळी त्यांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या कामाचे कौतुक केले. त्याप्रमाणे पॅटर्न राबवण्याची मागणी करताना ते म्हणाले, ""सर्वच कोरोना बाधितांना थेट रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. ज्यांना फार त्रास आहे, जुन्या व्याधी आहेत, त्यांनाच रुग्णालयात न्यावे. ज्यांना लक्षणे दिसत नाहीत, मात्र तो पॉझिटिव्ह असतील तर घरीच उपचार करावेत. तेथे त्रास जाणवायला लागला तर त्वरीत रुग्णालयात न्यावे. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. घरोघरी वैद्यकीय क्षेत्रातील लोक भेट देतील, याची खबरदारी घ्यावी. दिल्लीत हेच तर झाले आहे. सांगलीत असे होईल, याची लोकांना खात्री नाही. त्यामुळे ते घाबरून रुग्णालयात जात आहेत. तेथे आता प्रचंड गर्दी झाली आहे. अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. हे गंभीर आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kejriwal pattern has to be implemented; Role of BJP MP Sanjaykaka Patil