खरीप कर्जवाटपाला बॅंकांकडून ठेंगाच 

तात्या लांडगे
मंगळवार, 26 जून 2018

सोलापूर : यावर्षी खरीप हंगामात राज्यातील विविध बॅंकांना 43 हजार 342 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत राज्यातील सुमारे सव्वा कोटी शेतकऱ्यांपैकी 13 लाख शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. काही बॅंकांनी अद्यापही कर्जवाटपाला प्रारंभच केला नसल्याची चर्चा आहे. 

कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची मागील दहा-अकरा महिन्यांपासून पडताळणीच सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असूनही बहुतांशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. परिणामी खात्यावर पूर्वीची थकबाकी दिसत असल्याने त्यांना बॅंकेतून नव्याने कर्जच मिळत नाही. खरीप हंगामात मशागतीसह बी-बियाणे, खते व औषध खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. कर्जमाफीची वाट न पाहता सोने तारण ठेवून कर्ज काढायचे ठरवले तरीही थकबाकी असल्याच्या कारणास्तव बॅंकांकडून काही शेतकऱ्यांना परत पाठविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावर पहिला बोजा, त्यातच कर्जमाफीला विलंब, यामुळे आता खासगी सावकाराशिवाय दुसरा पर्यायच आता शिल्लक नसल्याच्या भावना शेतकऱ्यांकडून व्यक्‍त होत आहेत.

खरिपाच्या मशागतीसाठी बॅंकेकडून मला नव्याने कर्ज हवे आहे. परंतु, माझ्याकडे 80 हजारांचे पीककर्ज असल्याने बॅंक खाते थकबाकीत गेले आहे. कर्जमाफीचा अर्ज केला असून अद्यापही यादीत नाव न आल्याने बॅंकेकडून मला कर्ज मिळत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मी बॅंकेकडे सोने तारणावर कर्ज मागितले, तरीही ते देत नाहीत. 
- सोमनाथ करंडे, कळमण ता. उत्तर सोलापूर 

आकडे बोलतात... 
खरीप हंगाम 
राज्यातील एकूण शेतकरी - अंदाजे 1.25 कोटी 
एकूण कर्जवाटपाची रक्‍कम - 43,342.43 कोटी 
वाटप झालेले कर्ज - 4,686 कोटी 
कर्ज मिळालेले शेतकरी - 13,07,638

Web Title: kharip loan ignores by bank