खटावमध्ये सापडली बॉंबसदृश वस्तू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

खटाव - येथील इंदिरानगरातील घरात बॉंबसदृश स्फोटक वस्तू सापडल्याने खळबळ उडाली. बॉंबशोधक पथकाने ही वस्तू ताब्यात घेऊन पंचनामा केला. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड येथे सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्‍शन थेट खटावपर्यंत पोचल्याने पोलिस कसून तपास करत आहेत.

खटाव - येथील इंदिरानगरातील घरात बॉंबसदृश स्फोटक वस्तू सापडल्याने खळबळ उडाली. बॉंबशोधक पथकाने ही वस्तू ताब्यात घेऊन पंचनामा केला. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड येथे सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्‍शन थेट खटावपर्यंत पोचल्याने पोलिस कसून तपास करत आहेत.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर स्फोटक बाळगल्याप्रकरणी चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये विश्‍वनाथ साळुंखे याच्यावर काल (ता. 23) गुन्हा दाखल झाला आहे. बॉंबसदृश वस्तूपैकी एक वस्तू त्याने खटावमध्ये पाठवली होती. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलिस उपनिरीक्षक वाघ, हवालदार बबन गायकवाड, पोलिस नाईक कुंभार यांनी संबंधित घराची तपासणी केली. बॉंबशोधक पथकातील हवालदार विजय साळुंखे, प्रमोद नलवडे, राजेंद्र शेळके, प्रमोद भुजबळ यांनी तपासणी करून वस्तू स्फोटकजन्य असल्याचे सांगितले. सापडलेल्या बॉंबसदृश वस्तूचा पंचनामा करून पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशनकडे पाठवण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंखे हा इंदिरानगरातील श्रीमती सिंधू शिवाजी रोकडे व त्यांच्या नातेवाईकांना बॉंबने उडवून देण्याची धमकी देत होता. एका नातेवाईकाच्या साहित्यातून त्याने बॉंबसदृश वस्तू श्रीमती रोकडे यांच्या घरी पाठवली. सोमवारपासून ही वस्तू रोकडे यांच्या घरीच होती. साळुंखे यानेच फोन करून रोकडे यांना बॉंबसदृश वस्तू असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. बॉंबशोधक पथक तसेच श्वानपथकाने घर व परिसराची तपासणी करण्यात आली. गुप्तवार्ता विभागाचे पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड यांनीही घटनास्थळी भेट दिली. राजेंद्र सावंत्रे तपास करत आहेत.

Web Title: Khatava objects found in bomb similar