अपहरण झालेल्या वरदची सुटका करण्यात पोलिसांना यश 

varad
varad

इस्लामपूर : सोमवारी सायंकाळपासून येथील नवोदयच्या क्लास समोरुन अपहरण झालेल्या वरदराज बाळासाहेब खामकर या पाचवीतील विद्यार्थ्याचा शोध लावण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले आहे. त्याचे अपहरण करण्यात पोलिस खात्यातील वरदच्या नातेवाईकाचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या पोलिस कर्मचार्‍यासह इस्लामपूर पोलिसांनी इतर चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या बाबतची सविस्तर माहिती आज सायंकाळी पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे माध्यमांना देणार आहेत.

येथील मालती कन्या महाविद्यालयातील ग्रंथपाल बाळासाहेब खामकर यांचा पाचवीत शिकणारा मुलगा सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून गायब होता. त्याचे पांढर्‍या रंगाच्या गाडीतून अपहरण झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झाले होते. त्यावरुन इस्लामपूरचे पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी पाच पथके तयार करत तपासासाठी रवाना केली. गेल्या काही दिवसांपासून नातेवाईक व इतर लोकांच्या बरोबर खामकर यांचा झालेला संवाद व त्यातून संशय बळावलेल्या लोकांवर त्यांनी टार्गेट करत तपासाची सुत्रे हलवली.

इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी वरदला कोल्हापूर येथील हॉटेल मधून ताब्यात घेतले. रात्री दीडच्या सुमारास वरदला पोलिस इस्लामपूरला घेऊन आले. वरदने नातेवाईकांना पाहताच मिठी मारली. नातेवाईकांच्याही डोळ्यात पाणी आले. हे पाहताना इतरांनाही गहीवरुन आले. वरदच्या अपहरणामध्ये खामकर यांच्या नातेवाईकांचाच समावेश आहे. यात एक पोलिस कर्मचारी ही सुत्रे हलवत होता. विशेष म्हणजे वरदच्या अपहरणानंतर तो पोलिस कर्मचारी त्याच्या शोधासाठी इस्लामपूर पोलिसांच्या बरोबर गेले दोन दिवस पळापळ करत होता. मात्र चाणाक्ष पोलिसांनी विणलेल्या जाळ्यात वरदचा नातेवाईक पोलिस अलगद अडकला. व वरदची माहिती मिळाली. त्याची सुखरुप सुटका झाली. या घटनेने इस्लामपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com