व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

अभिजित जालंदर देशमुख (वय 30), सुनील रघुनाथ चवरे (वय 37, दोघे रा. चाळशिरंबे, ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत. त्यांच्या सहा साथीदारांचा शोध सुरू आहे. 

कोल्हापूर : आर्थिक व्यवहाराच्या कारणातून व्यवसायिकाचे आठ जणांनी मोटारीतून अपहरण करून त्याला डांबून ठेवण्यात आले. त्याचे कपडे फाडून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रमेश संतू कांबळे (वय 39, रा. म्हारूळ, ता. करवीर) यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

अभिजित जालंदर देशमुख (वय 30), सुनील रघुनाथ चवरे (वय 37, दोघे रा. चाळशिरंबे, ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत. त्यांच्या सहा साथीदारांचा शोध सुरू आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, रमेश कांबळे हे व्यावसायिक म्हारूळ (ता. करवीर) येथील स्थानिक रहिवासी आहेत. त्यांची अभिजित देशमुख यांच्याशी चांगली ओळख होती. त्यांनी त्यांच्या आर्थिक गरजेपोटी मे 2015 मध्ये उसणे तीन लाख रूपये दिले होते. त्यावेळी त्यांनी कांबळे यांना बँकेचा धनादेश आणि स्टँम्प पेपर लिहून दिला होता, पण त्यांनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे कांबळे यांनी देशमुख यांना फोन करून धनादेश बँकेत भरून वकिलांमार्फत नोटीस पाठवत असल्याचे त्यांना सांगितले.

याच रागातून संशयित अभिजीत आणि सुनील या दोघांनी त्यांच्याकडून धनादेश व स्टँम्प परत मागितला. मात्र, कांबळे यांनी ते देण्यास नकार दिला. यातूनच त्या दोघांनी सहा साथीदारांच्या मदतीने 30 जुलैला कुडीत्रे (ता. करवीर) येथून त्यांचे मोटारीतून जबरदस्तीने अपहण केले. त्यानंतर त्यांना आष्टा, इस्लामपूर (सांगली) आणि नेर्ले (ता. कराड) येथे नेऊन डांबून ठेवले. तसेच त्यांना काठीने व लाथाबुक्‍यांनी मारहाण केली.

तसेच त्यांच्या अंगावरील कपडे फाडून जातीवाचक शिवीगाळही केली. त्यानंतर त्यांच्या मालकीचा ट्रॅक्‍टर घेऊन तो हस्तांतर करण्याच्या फॉर्मवर जबरस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्या. धनादेश, स्टँम्प पेपरही काढून घेऊन त्यांची गुरुवारी (ता.1) सायंकाळी सुटका केली, असे कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादेत म्हटले आहे. त्यानुसार करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संशयित अभिजीत व सुनील या दोघांना काल (ता.2) रात्री उशिरा अटक केली. पोलिस अन्य सहा साथीदारांचा शोध घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping and beating a businessman 2 arrested