मतदारच ठरला खरा राजा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

उमेदवारांच्या गावात मोठा उत्साह - सकाळपासून कार्यकर्त्यांची केंद्रावर लगबग

उमेदवारांच्या गावात मोठा उत्साह - सकाळपासून कार्यकर्त्यांची केंद्रावर लगबग

कोल्हापूर - तुमचा केंद्र नंबर किती, या केंद्रावर तुम्ही मतदान करा, तुमचा मतदार क्रमांक बरोबर आहे, असे सांगणारे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आज मतदारांना खऱ्या अर्थाने ‘राजा’चे स्थान दिले. मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्वयंप्रेरणेने बाहेर पडल्यामुळे जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज येथे उत्स्फूर्त उत्साहाने मतदान झाले. उमेदवारांनी वाहतुकीसाठी ठेवलेल्या वाहनांऐवजी स्वत:च्याच वाहनातून येऊन मतदान करण्यासाठी लोकांची झुंबड उसळली. मतदान जनजागृती आणि स्वयंप्रेरणेमुळे नवमतदारांनीही मतदानाचे कर्तव्य बजावले. 

जिल्ह्यात सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरवात झाली. यापूर्वी साडेसातला मतदान सुरू झाल्यानंतर साडेनऊनंतरच मतदार केंद्रावर येत होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र सकाळी सातपासूनच लोक मतदान केंद्रावर रांगा लावून होते. ज्या गावातील उमेदवार आहे, त्या गावात तर मोठ्या उत्साहाने मतदार घराबाहेर पडल्याचे चित्र होते. गावोगावी मतदानाला सकाळी सुरवात झाल्यापासून मतदान संपेपर्यंत केंद्राबाहेर मतदार, उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू राहिली. 

कागल तालुक्‍यातील कसबा सांगाव हे संवेदनशील गाव आहे. या मतदान केंद्रावर विशेष पोलिस पथक तैनात केले होते. सकाळी अकरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले. या मतदान केंद्रावर नवमतदारांसह ९० व ९३ वर्षांच्या ज्येष्ठ महिलांनीही उत्साहाने मतदान केले. उमेदवारांनीही कोणत्याही प्रकारची घाईगडबड न करता आपापल्या मतदारांना केंद्रापर्यंत पोहच करण्याची दक्षता घेतली. सकाळी जनावरांना वैरण किंवा वाढे आणण्यासाठी निघालेल्या लोकांनी मतदानाला प्राधान्य देऊन दैनंदिन कामाला महत्त्व दिले. मौजे सांगावमध्येही चुरशीने मतदान झाले. विशेषतः मतदानासाठी महिलांनी मोठी गर्दी केली.

आचारसंहितेचा भंग होणार नाही, मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी विशेष काळजी घेतली. त्यानुसारच मतदान झाले. इतर वेळी उमेदवारांकडून वाहनांमधूनच मतदारांची वाहतूक होत होती. तेथे मात्र मतदारांनी स्वतःच्याच वाहनातून येऊन आपला हक्क बजावल्याचे चित्र होते. सिद्धनेर्ली मतदारसंघातील गोरंबे गावातही शांततेत मतदान झाले.  

गडहिंग्लज तालुक्‍यातील नेसरी येथील प्राथमिक शाळेत झालेल्या मतदानाला हिंदूंसह मुस्लिम महिला व पुरुष मतदारांनी प्रतिसाद दिला. मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही. त्यामुळे सकाळी अंदाज घेत सुरू असणारे मतदान बारानंतर मात्र गतीने झाले. हरळी बुद्रुक येथे मतदान कमी असल्याने गर्दीही कमी होती. या ठिकाणी शिस्तबद्ध मतदान झाले. या केंद्रावर अनेक ज्येष्ठ मतदारांसह अंध मतदार भाऊ आप्पा जाधव यांनी मतदान केले. गडहिंग्लजमध्ये मतमोजणीसाठी पॅव्हेलियन येथे जय्यत तयारी केली आहे. वेळेत आणि सुव्यवस्थित मतमोजणी व्हावी यासाठी प्रशासन योग्य काळजी घेणार असल्याचे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी सांगितले. दरम्यान, याच तालुक्‍यातील गिजवणे येथील कुमार विद्या मंदिर येथे झालेल्या मतदानासाठी दुपारी अडीचच्या दरम्यान भर उन्हातही महिला मतदारांची झुंबड उसळली. येथे शंकर हरी ढेरे (वय ९७) यांनी चालताही येत नसताना आपला मतदानाचा हक्क बजावला. तर, याच केंद्रावर आठ ते दहा नवमतदार रांगेत उभे होते. गारगोटी येथे मौनी विद्यापीठ केंद्रावर दुपारी अडीचपर्यंत मतदारांनी गर्दी केली होती. दरम्यान, अडीच ते ४ पर्यंत किरकोळ मतदान झाले. त्यानंतरही मतदानासाठी पुन्हा गर्दी केली. एकूणच जिल्ह्यात आज उत्स्फूर्त मतदान झाले. नवमतदारांचाही चांगला सहभाग होता. करवीर तालुक्‍यातील बहिरेश्‍वर, कोगे, पाडळी खुर्दमध्येही उत्स्फूर्त मतदान झाले. पाडळी खुर्दमध्ये सायंकाळी ६.५५ वाजता मतदान पूर्ण झाले.

गारगोटीपासून सुमारे ६५ किलोमीटरवर असणाऱ्या चिकेवाडी या दुर्गम भागातील गावात २३ मतदान आहे. या मतदानासाठी स्वतंत्र केंद्र दिले होते. येथील सर्व मतदान केंद्रांतील ३ लाख २३ हजार ७७२ मतदारांचे फोटो मतदार यादीवर घेतले आहेत. तसेच या ठिकाणच्या एकाही मतदान केंद्रावर डिजिटल फलक लावले नाहीत, हेच या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. 
- कीर्ती नलवडे,  प्रांताधिकारी, भुदरगड तालुका

तालुका संवेदनशील आहे; पण दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. उमेदवार आणि कार्यकर्त्यांनीही संयमाने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
- किशोर घाडगे तहसीलदार, कागल.

गडहिंग्लज तालुक्‍यात काही गावे संवेदनशील आहेत; पण कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत झाली आहे. मतदान यंत्रामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा आला नाही. मतमोजणीही शांततेत होईल, याची काळजी घेतली आहे. 

- संगीता राजापूरकर-चौगुले,  गडहिंग्लज प्रांताधिकारी.

Web Title: The king was real voter