सोलापूरकरांनी जाणून घेतली वाडा संस्कृती !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

सोलापूर - जवळपास शंभर वर्षांपूर्वीच्या वाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन रविवारी सोलापूरकरांनी वाडा संस्कृती जाणून घेतली. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त "इंटॅक' संस्थेने हा उपक्रम आयोजिला होता.

सोलापूर - जवळपास शंभर वर्षांपूर्वीच्या वाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन रविवारी सोलापूरकरांनी वाडा संस्कृती जाणून घेतली. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त "इंटॅक' संस्थेने हा उपक्रम आयोजिला होता.

पश्‍चिम मंगळवार पेठ परिसरातील काडादी वाडा, अब्दुलपूरकर वाडा आणि शिरसी वाड्यातील संपूर्ण माहिती जाणून घेऊन जागतिक वारसा सप्ताह आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. "इंटॅक'च्या समन्वयक सीमंतिनी चाफळकर, सदस्या श्‍वेता कोठावळे, पुष्पांजली काटीकर, जानकी पटेल, सदस्य नितीन अणवेकर यांनी उपस्थितांना वाडा संस्कृतीची माहिती दिली. काडादी वाड्यामधील विहीर वैशिष्ट्यपूर्ण होती. दगड, वीट आणि चुन्याने केलेले बांधकाम आणि त्यावरील सुंदर नक्षीकाम सर्वांनाच भावले. अब्दुलपूरकर वाड्यात अमित आणि रोहित अब्दुलपूरकर, शिरसी वाड्यात अंजली शिरसी यांनी वाडा पाहण्यासाठी आलेल्या सोलापूरकरांचे आदरातिथ्य करत संपूर्ण वाड्याची माहिती दिली.

या उपक्रमात गोवर्धन चाटला, मसाई चाटला, सौरभ शिरसी, विजय जाधव, नितीन अणवेकर, डॉ. संभाजी भोसले, अभिजित भडंगे, देवांश ठक्कर, जैद काखंडीकर, महादेव फुलसरे आदी सहभागी झाले होते.

अशी आहे वाडा संस्कृती
वाड्यात हवा खेळती राहावी यासाठीच्या कमानी आणि वेगवेगळ्या आकाराच्या खिडक्‍या, बांधकाम मजबूत व्हावे यासाठी वापरण्यात आलेले दगड, चुना, सागवानी लाकूड, त्रिकोणी नक्षीदार खिळे, जुन्या पद्धतीचे घड्याळ, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नक्षीदार पन्हाळा, पक्ष्यांसाठी बांधकामावेळी केलेली घरट्यांची रचना, ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव असलेल्या वेगळ्या आकाराच्या सागवानी खुर्च्या, खिडक्‍या आणि दरवाजांना असलेल्या रंगीत काचा, पितळी आणि तांब्याची भांडी पाहून सर्वजण वाडा संस्कृतीमध्ये रमून गेले होते.

हे शब्द पडले कानावर
ओसरी, तळघर, चिमनाळ, खुंटी, उखळ, मुसळ, शेर, हंडा, डोणी, अडसर, कट्टा, कचेरी, झुंबर, कोठार, दगडी जातं, उंबरा, देवळी, पितळी झोपाळा, दगडी पाट, जुने ब्रिटिशकालीन पंखे, मोरी, ओटा, कोनाडा, चूल, धुराडे, उलतणे, भातवाडी, पळी, सांडसी, टाटाळं, पडवी, माजघर, देव्हारा, चौक.

पाहा व्हिडिओ आणि छायाचित्रे..
वाडा भेटीच्या उपक्रमाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पाहण्यासाठी "सोलापूर सकाळ'च्या www.facebook.com/SolapurSakal या पेजला भेट द्या..

"इंटॅक'मुळे जुन्या वाड्यांमधील संस्कृतीची माहिती मिळाली. यानिमित्ताने अडसर, चिमनाळ यासारखे शब्दही कानावर पडले. वाड्यांमधील सुंदर कलाकृती पाहून खूपच छान वाटले.
- शोभा डुमणे, निवृत्त शिक्षिका

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त ऐतिहासिक वाड्यांना भेट देऊन खूपच छान वाटले. आपल्या जुन्या संस्कृतीची माहिती यानिमित्ताने जाणून घेता आली.
- संभ्रम अणवेकर, सराफ

Web Title: to know the culture of the Castle