सहकारी बॅंकांसाठी आता 'नॉलेज हब'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

सोलापूर - देशातील बॅंकिंग व्यवसायाला हादरवून सोडणाऱ्या कॉसमॉस बॅंकेवरील सायबर दरोड्यानंतर सहकारी व नागरी बॅंकांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता नागरी सहकारी बॅंक असोसिएशनच्या पुढाकारातून नोव्हेंबरपर्यंत पुण्यात "नॉलेज हब' उभारण्यात येणार आहे.

सोलापूर - देशातील बॅंकिंग व्यवसायाला हादरवून सोडणाऱ्या कॉसमॉस बॅंकेवरील सायबर दरोड्यानंतर सहकारी व नागरी बॅंकांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता नागरी सहकारी बॅंक असोसिएशनच्या पुढाकारातून नोव्हेंबरपर्यंत पुण्यात "नॉलेज हब' उभारण्यात येणार आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची शेड्यूल्ड को-ऑपरेटिव्ह बॅंक म्हणून कॉसमॉस बॅंकेचा नावलौकिक आहे. या बॅंकेवर 11 व 13 ऑगस्ट रोजी सायबर हल्ला झाला आणि तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये लुटले. विदेशातील एटीएमबरोबरच पुणे, कोल्हापूर व देशातील विविध एटीएममधूनही पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. परंतु, "नॉलेज हब'मुळे अशा प्रकाराला निश्‍चितपणे आळा बसेल, असा विश्‍वास नागरी सहकारी बॅंक फेडरेशनकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

ठळक बाबी...
- विविध बॅंकांना "नॉलेज हब'च्या माध्यमातून अनुभव सांगता येतील
- बॅंकांच्या अडचणी व अनुभवांनुसार ठोस उपाययोजना करणे होईल सोयीस्कर
- लेखापरीक्षणासह अन्य अडचणींवरही बॅंकांना काढता येईल मार्ग
- स्वत:चे डाटा सेंटर असणाऱ्या अथवा बाहेरील कंपनीकडून डाटा सेंटरचे काम करणाऱ्या बॅंकांना होणार फायदा
- सायबर अटॅक व डेबिट कार्ड क्‍लोनिंग यांसह अन्य अडचणींची देवाणघेवाण शक्‍य
- एटीएम कार्डचे क्‍लोनिंग करून पैसे लुटण्याच्या प्रकाराला बसेल आळा

देशात दिवसेंदिवस सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सहकारी, नागरी बॅंकांमधील पैसे आणखी सुरक्षित राहावेत, या उद्देशाने "नॉलेज हब' उभारण्यात येणार आहेत. ते प्रारंभी पुण्यात सुरू होईल, त्यानंतर टप्प्याटप्प्यांत बहुतांशी जिल्ह्यात सुरू होतील. त्यामुळे बॅंकिंग व्यवहारात सुरक्षितता येईल.
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बॅंक फेडरेशन

Web Title: Knowledge Hub for Cooperative Bank