कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा चार दिवस बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - बालिंगा आणि शिंगणापूर उपसा केंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने उपसा केंद्रेच बंद पडून शहरातील पाणीपुरवठा चार दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटसकरीने करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उपसा केंद्रातील पुराच्या पाण्याची पातळी कमी होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा सुरू होऊ शकत नसल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

महापुराचे पाणी शिंगणापूर उपसा केंद्र आणि बालिंगा उपसा केंद्रात गेले आहे. त्यामुळे येथील उपसा पंपच बंद पडले आहेत. पंप महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्यातून काढून घेतले आहेत. पुराची पातळी कमी होईपर्यंत तसेच दोन्ही पंप दुरुस्त करूनच पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. शहराला बालिंगा आणि शिंगणापूर या दोन्ही ठिकाणांहून सुमारे १२० एमएलडी पाण्याचा उपसा दररोज केला जातो. पावसामुळे भोगावती आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांना महापूर आला आहे. उपसा केंद्रातूनही पाणी शिरले आहे. तेथील उपसा पंप, विद्युत मोटारी बंद केल्या आहेत. वीजपुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती आटोक्‍यात येत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा बंदच राहणार.

कळंबा फिल्टर सुरू राहणार
शहरातील कळंबा तलावावरून शहरातील काही भागाला पाण्याची योजना अद्यापही सुरू आहे. ही योजना इतक्‍या पावसातही अजून सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इतर योजना बंद असताना कळंब्याची योजना मात्र अद्याप सुरू आहे.

महापालिकेचे वीस टॅंकर भाडेतत्त्वावर
पाणीपुरवठा बंद असल्याने महापालिकेने २० टॅंकर भाडेतत्त्वावर घेतले आहेत. महापालिकेच्या मालकीचे नऊ टॅंकर आहेत. त्यामुळे एकूण २९ टॅंकरद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.

मुख्य इमारतीत आपत्‌कालीन कक्ष
महापुराच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मुख्य इमारतीतच आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तेथे दोन अधिकाऱ्यांची नियुक्त केली आहे. अंतर्गत लेखापरीक्षक सुरेंद्र शेलार आणि मालमत्ता अधिकारी प्रमोद बराले यांची नियुक्ती केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur city water supply will be closed for four days