कोल्हापूर जिल्ह्यात 356 एटीएम सुरू

कोल्हापूर जिल्ह्यात 356 एटीएम सुरू

कोल्हापूर - रिझर्व्ह बॅंकेकडून जिल्ह्यात 348 कोटी रुपये उपलब्ध झाल्याने 356 एटीएम केंद्रे आजपासून सुरू झाली आहेत. नोटाबंदीमुळे गेल्या काही दिवसांपासून मनस्ताप सहन करीत असलेल्या नागरिकांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, पाचशेच्या नोटा अद्याप उपलब्ध न झाल्याने आणि शंभराच्या पुरेशा नोटा शिल्लक नसल्याने आणखी काही दिवस तरी ग्राहकांना एटीएममधून दोन हजारांच्याच नोटा स्वीकाराव्या लागणार आहेत. चार प्रमुख बॅंका आणि अकरा करन्सी चेस्टमधून चलनाचे व्यवहार सुरू आहेत.

एटीएम मशिनचे कॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. शंभराच्या नोटांचा पुरवठाही येत्या एक-दोन दिवसांत सुरू होईल, असा दावा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी केला. गेल्या काही दिवसांपासून एटीएम बंद असल्याने ग्राहकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही एटीएम सुरू होते; मात्र ते सुरू झाल्यानंतर लगेचच लांबच लांब रांगा लागत होत्या. परिणामी काही तासांतच एटीएममधील पैसे संपत होते. शिवाय एका कार्डावर फक्त दोन हजार रुपयेच मिळत होते. तेही एकच नोट, त्यामुळे ग्राहकांची कोंडी झाली होती. दोन-चारशेच्या खरेदीसाठीही हॉटेल, पेट्रोल पंप, खासगी दवाखाने, औषध दुकाने येथे दोन हजारांची नोट स्वीकारली जात नव्हती. कारण शंभरच्या नोटांचा तुटवडा असल्याने प्रत्येकाला रक्कम परत कशी द्यायची, हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. शिवाय त्यांनी जुन्या नोटा स्वीकारण्यासही नकार दिल्याने खरेदी-विक्री थंडावली होती. मात्र, आजपासून एटीएम केंद्रे सुरू झाली आहेत आणि शंभर-पाचशेच्या नोटाही लवकरच उपलब्ध होणार असल्याने ही परिस्थिती निवळण्याची शक्‍यता आहे.

विवाह समारंभासाठी अडीच लाख रुपये काढण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. त्यानंतर लग्नपत्रिका जोडलेले अनेक अर्ज बॅंकांकडे येऊन पडले आहेत; मात्र याबाबतचा कोणताही लेखी आदेश नसल्याने हे अर्ज मंजूर केलेले नाहीत. चालू खाते, कॅश क्रेडिट आणि डी.डी.साठी मर्यादा पन्नास हजारांपर्यंत वाढविल्याने व्यापाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी बोटाला शाई लावण्याचा प्रयोगही यशस्वी होत आहे. नोटा बदलायला तेच ते लोक पुन्हा पुन्हा येत होते; मात्र शाई लावण्यास सुरवात केल्यानंतर ही संख्या कमी झाली आहे. भाजी विक्रेत्यापासून मोठ्या उद्योग व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच नोटाबंदीचा फटका सहन करावा लागला आहे. पाचशेची नोट चलनात येत नाही तोपर्यंत सुट्या पैशांचा प्रश्‍न सुटणार नाही. जिल्हा प्रशासन आणि अग्रणी बॅंकेने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न केले आहेत; मात्र पूर्ण क्षमतेने चलनी नोटा बाजारात येत नाहीत तोपर्यंत व्यवहार सुरळीत होणार नाहीत.

स्वाइप मशीन मोफत
बॅंक ऑफ इंडियाने डेबिट कार्ड स्वाइप करण्यासाठी व्यापाऱ्यांना मशीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानाचा परवाना, पार्टनरशिप डीड, संचालक मंडळाचा ठराव, मागील दोन-तीन वर्षांचा ताळेबंद, बॅंक ऑफ इंडियाकडे खाते नसल्यास ज्या बॅंकेत खाते आहे तेथील वर्षाचे स्टेटमेंट, नव्या व्यवसायासाठी बॅलेन्सशीट व खातेउतारा अशी कागदपत्रे त्यासाठी द्यावी लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com