#KolhapurFlood श्री क्षेत्र नृसिंहवाडी पूर्ण जलमय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नृसिंहवाडी - कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पुरामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडीला सर्वाधिक पुराच्या पाण्याचा फटका बसला असून गाव पूर्ण जलमय झाले.

नृसिंहवाडी - कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पुरामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडीला सर्वाधिक पुराच्या पाण्याचा फटका बसला असून गाव पूर्ण जलमय झाले.

दरम्यान श्रीची उत्सव मूर्ती पूजेचे मानकरी हावळे पुजारी यांच्या घराजवळही पुराचे पाणी आले असले तरी ऐन महापुरातदेखील तितक्‍याच भक्तिभावाने ब्रह्मवृंदामार्फत उत्सवमूर्तीसमोर सर्व पूजाविधी नित्यनियमाने मनोभावे सुरू आहेत. काल सुमारे दोन हजार पूरग्रस्तांचे स्थलांतर केले होते. आजदेखील सुमारे शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले. 

नृसिंहवाडी-शिरोळ मार्गावरही सुमारे चार फुटांपेक्षा पाणी आल्यामुळे एकमेव परतीच्या मार्गाचा संपर्कदेखील तुटला. अनेक घरे, वाहने, गोठे दुकाने पाहून अनेकांच्या डोळ्यांत सध्या अश्रू तरळत आहेत. वाढत जाणारे पुराचे पाणी व सतत पडणारा पाऊस यामुळे पूरग्रस्तांच्या मनात भीतीची छटा अधिकच गडद होताना दिसते. 

आज गावातील शैकडो कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थालांतरीत केले आहे. दत्त देवस्थान, पुजारी वर्ग, तरुण मंडळे, ग्रामपंचायत सदस्य, देवस्थानचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था जीव धोक्‍यात घालून पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी नेत आहेत. 

पोल्ट्रीतील चार हजार पक्ष्यांना जलसमाधी
नृसिंहवाडी मार्गावर असणाऱ्या अमर नलवडे, सुहास खोचरे यांच्या सुमारे चार हजार कोंबड्यांची पोल्ट्री बुडाल्याने चार हजार पक्ष्यांना जलसमाधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

पाण्यात बसून साकडे 
नृसिंहवाडीत पुराचे पाण्याचे संकट टळावे म्हणून भरपावसात आणि महापुराच्या पाण्यात बसून दीपक मोरभट (पुजारी) यांनी कृष्णा नदीचे पाणी कमी व्हावे यासाठी पाण्यात बसून प्रार्थना केली. 

रुपयाचीही मदत नाही 
महापुराने हाहाकार माजवला असताना देखील अद्याप शासनाकडून रुपयाची मदत, जीवनावश्‍यक वस्तूंच्या एक पुडादेखील मिळाला नसल्याची खंत देवस्थान सचिव अमोल विभुते यांनी केले. 

चारी बाजूने संपर्क तुटला 
नृसिंहवाडी-शिरोळ मार्गावरही पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. नृसिंहवाडीला जोडणारा औरवाड, कुंरूदवाड नंतर शिरोळ मार्गावर ही पाणी आल्याने नृसिंहवाडीचा संपर्क तुटला आहे. 

ट्रॅक्‍टरच्या दोन चाकांवर स्थलांतर 
नृसिंहवाडी-शिरोळ मार्गावर सुमारे आज वीसेक फेऱ्या ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून कमरेएवढ्या पाण्यातून करून सुनील भागत, प्रतीक धनवडे, सुनील धनवडे, हेमंत गवळी यांच्यासह अनेक युवकांनी महापुरात उतरून रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून पूरग्रस्त वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. ट्रॅक्‍टरमध्ये सुमारे शंभरहून अधिक पूरग्रस्त असल्यामुळे त्याच्या बोजामुळे ट्रॅक्‍टरचे पुढील दोन चाके मार्गाचा प्रवास करेपर्यंत अंतराळी होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood Narsinhwadi in water