#KolhapurFlood हिरण्यकेशीवरील व्हिक्टोरिया पूल वाहतूकीसाठी खूला

#KolhapurFlood हिरण्यकेशीवरील व्हिक्टोरिया पूल वाहतूकीसाठी खूला

कोल्हापूर - जिल्ह्यात अनेक भागात आज पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळाला. भोगावती नदीला आलेला पूर आता ओसरू लागला आहे. राधानगरीतून होणार विसर्गही कमी झाला आहे.  हिरण्यकेशी व चित्रा नदी अद्याप धोक्‍याची पातळी ओलांडून वाहत आहेत पण आजरा येथील हिरण्यकेशीवरील व्हिक्टोरिया पुल वाहतूकीसाठी खुला केला आहे. 

व्हिक्‍टोरिया पुल वाहतुकीसाठी खुला 
आजरा - आजरा तालुक्‍यात पावसाचा जोर कमी झाला आहे; पण पुरपरिस्थिती कायम आहे. हिरण्यकेशी व चित्रा नदी अद्याप धोक्‍याची पातळी ओलांडून वाहत आहे. सोमवारी (ता. 5) वाहतुकीसाठी बंद ठेवलेला व्हिक्‍टोरीया पुलाची वाहतुक पुर्ववत सुरू करण्यात आली. आज येथून तुरळक वाहतुक सुरू होती. साळगाव व सोहाळेमध्ये पाणी घुसले असून या दोन्ही गावासह पेरणोली, कोरीवडे, हरपवडे, देवर्डे, वेळवट्टी, देवकांडगाव, गवसे, घाटकरवाडी, किटवडे गावातील शिवार पाण्याखाली गेले आहेत. तालुक्‍यातील साळगावसह सर्व बंधारे पाण्याखाली असून वाहतुक ठप्प आहे. दरम्यान, काल रात्री व आज दिवसभरात पावसाने सकाळच्या टप्प्यात विश्रांती घेतल्याने पुराची पातळी पाच सहा फुटाने कमी झाली. पण जनजीवन विस्कळीत आहे. 

तालुक्‍यात चोवीस तासात 187 मिलीमीटर पाऊस झाला. पाऊस व वाऱ्यामुळे तालुक्‍यात काल दिवसभरात 115 घरांची पडझड झाली. यामुळे सुमारे तीस लाखांचे नुकसान झाले. वीजेचा लपंडाव सुरु आहे. पेरणोली परिसरात वीजेची सेवा खंडीत झाली आहे. तालुक्‍यातील बहुतांश गावे अंधारात आहेत. महाविरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम सुरु आहे. भ्रमणध्वनी व दुरध्वनीची सेवा विस्कळीत आहे. वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. 

"चित्री'तून 2990 क्‍युसेकने विसर्ग 
चित्री मध्यम प्रकल्पातून 2990 क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. विद्युत गृह विसर्ग 180 तर सांडव्यावरून विसर्ग 2810 इतका आहे. मंगळवारी 4100 क्‍युसेक विसर्ग सुरु होता. काल दिवसभरात धरण क्षेत्रात 250 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.  

भोगावती हळूहळू जनजीवन पूर्वपदावर

राशिवडे बुद्रुक - भोगावती नदीला आलेल्या महाभयंकर पुरामुळे विस्कटलेले जनजीवन आता काहीसे सुरळीत होण्याची शक्‍यता आहे. भोगावती नदीचे पाणी आता हळूहळू ओसरू लागल्याने लोकांना दिलासा मिळाला. आज सकाळपासून सायंकाळपर्यंत महापुराचे पाणी तीन फुटाने कमी झाले. राधानगरी धरणातून विसर्ग कमी झाल्याने आता या काठावरील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.  राशिवडे व भोगवती परिसरासह राधानगरी तालुक्‍यातील काल पासून बंद असलेल्या विद्युत पुरवठाही आज दुपारनंतर सुरळीत झाला. 

चार दिवसापूर्वी राधानगरी धरण भरल्यानंतर भोगावती नदीला महापूर येण्यास सुरुवात झाली. आजवरच्या इतिहासात प्रथमच भोगावती नदी काठावर तील सर्व गावांना नदीच्या पाण्याने स्पर्श केला. काठावरील १४ गावांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे सव्वादोनशे कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
काल संध्याकाळपासून पावसाचा जोर ओसरल्याने धरणातून विसर्ग कमी झाला. आज सकाळपर्यंत सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले. सकाळपासून सायंकाळपर्यंत महापूराची पातळी उभी तीन फूट खाली गेली. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कमी होता मात्र त्यानंतर पुन्हा जोर धरला असल्याने पाणी वाढल्यास काय करायचे ही भीती नागरिकांना सतावत आहे. असे असले तरी विसर्ग थांबल्याने पाणी झपाट्याने पत्राकडे सरकण्याची शक्‍यता आहे. परिणामी कोल्हापुर-राधानगरी मार्ग काहीसा खुला होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी चार दिवस लागतील.

मार्ग अद्याप बंदच
अद्यापही कोल्हापूरकडे जाणारे सर्व मार्ग बंद आहेत. याच्या सडोली खालसा, हळदी’ कोथळी, भोगावती, राशिवडे येथे पाणी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com