#KolhapurFloods शिरोळला आठ हजार ग्रामस्थ पुरात 

#KolhapurFloods शिरोळला आठ हजार ग्रामस्थ पुरात 

शिरोळ - तालुक्‍याची महापुराची मगरमिठी आणखी तीव्र होत चालली आहे. पूरग्रस्तांना बाहेर काढण्याकरिता एनडीआरएफ जवानांबरोबरच शुक्रवारी दुपारी आर्मी दाखल झाली. तीस यांत्रिकी बोटींद्वारे पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू झाले आहे. शुक्रवारी सुमारे एक हजार पूरग्रस्तांना बाहेर काढण्यात आले असले तरी अद्यापही आठ हजार ग्रामस्थ पुरात अडकले आहेत. 

दरम्यान, सांगलीमध्ये आज पावसाने उसंत घेतली हीच काय ती समाधानाची बाब आहे. कोयना व अलमट्टी धरणांतून समन्वयाने पाण्याचा विसर्ग कायम राहिला तरीही पुढील तीन ते चार दिवस महापुराचे संकट कायम राहणार आहे. पावसाने पुन्हा जोर धरल्यास मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. 

आज दिवसभरात महापुरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू ठेवण्यात आले. ज्यांना बाहेर काढणे शक्‍य नाही, त्यांच्यासाठी लष्करी हेलिकॉप्टरने अन्नपुरवठा करण्यात आला. 

शिरोळ तालुक्‍यातील आलास, कनवाड, राजापूरवाडी, भैरेवाडी येथील पूरग्रस्तांना बाहेर काढण्याकरिता बचावकार्य करणाऱ्या पथकाला पुराच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे अडथळे निर्माण होत आहेत. शुक्रवारचा दिवस शिरोळ तालुक्‍यातील महापुराने वेढलेल्या गावांना अधिकच चिंताग्रस्त करणारा ठरला. पुराच्या पातळीत दोन फुटाने वाढ झाल्याने आलास, अर्जुनवाड, चिंचवाड, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, कनवाड, भैरेवाडी, बस्तवाड, हसूर या गावांत मोठ्या प्रमाणात लोक अडकून पडले. दुपारी दोनच्या सुमारास आर्मीचे 120 जवान चार बोटींसह शिरोळ येथे दाखल झाल्यानंतर प्रशासनाबरोबरच पूरग्रस्तांना दिलासा मिळाला. आर्मीच्या जवानांनी तीन तासांत शिरटी येथे अडकलेल्या 24 जणांना बाहेर काढले. 

आलास येथे नागरिकांना बाहेर काढताना एनडीआरएफच्या जवानांना अथक परिश्रम घ्यावे लागले. आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ-नृसिंहवाडी-औरवाड-कवठेगुलंदमार्गे महापुरातून यांत्रिकी बोटी घालून मार्ग दाखविण्याचे सारथ्याचे काम बजावले. सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर एनडीआरएफचे जवान व आमदार पाटील आलास येथे पोहचले. तेथे अडकलेल्या सुमारे एक हजार पाचशे नागरिकांपैकी चारशे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरोळ येथील पूरग्रस्तांच्या छावणीस भेट दिली. 

आमदार उल्हास पाटील आलासमध्ये मुक्कामाला 
आलास येथील पूरपरिस्थिती गंभीर आहे. येथून ग्रामस्थांना बाहेर काढण्याचे आव्हान प्रशासनापुढे होते. आमदार उल्हास पाटील यांनी एनडीआरएफच्या जवानांना मार्ग दाखवून ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी सारथ्य केले. ते परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आलास येथेच थांबले आहेत. 

पूरग्रस्तांचा चाऱ्यासाठी मोर्चा 
पूरग्रस्तांकरिता छावणी येथील पद्माराजे विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, श्री दत्त पॉलिटेक्‍निक कॉलेज, रमाबाई बुद्ध विहार, ईदगाह हॉल आदी ठिकाणी सुरू आहे. ही छावणी शिरोळ येथील लोकप्रतिनिधी चालवत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com