कोल्हापूर : पुरात पिकाच्या नुकसानीमुळे तिटवेत शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

महापुरात झालेल्या ऊस व भात पिकाच्या नुकसानीचा धक्का सहन न झाल्याने तिटवे (ता. राधानगरी) येथील शेतकऱ्याने तणनाशक प्राशन केले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग ऊर्फ बाळू हरी पाटील (वय 67) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

सरवडे -  महापुरात झालेल्या ऊस व भात पिकाच्या नुकसानीचा धक्का सहन न झाल्याने तिटवे (ता. राधानगरी) येथील शेतकऱ्याने तणनाशक प्राशन केले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग ऊर्फ बाळू हरी पाटील (वय 67) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

तिटवे येथील पांडुरंग पाटील दोन मुले व भावासह एकत्र शेती करतात. त्यांची घरची 30 गुंठे शेती आहे. याशिवाय कर्ता म्हणून ते अन्य शेतकऱ्यांची एक एकर शेती कसतात. पूर ओसरल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजता मळी व आर्जी या शेतातील पिके पाहण्यासाठी ते गेले होते. आठ ते दहा दिवस पिके पाण्याखाली असल्याने वाचण्याची शक्‍यता नव्हती. 

पीक गेल्यामुळे आता कोणतेही उत्पन्न मिळवू शकत नाही. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्वांना शेती वाहून गेल्याबद्दल सांगितले व वैफल्यग्रस्त अवस्थेत पुन्हा ते शेताकडे गेले. शेतामध्ये ते तळमळत असताना ग्रामस्थांना दिसले.

यावेळी त्यांनी तणनाशक प्यायल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ ग्रामस्थांनी त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र बुधवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांना शेती व बैलांची खूप आवड होती. त्यांची पत्नी व मुलाने हंबरडा फोडल्याने वातावरण अस्वस्थ झाले होते. आज सकाळी तिटवे गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची गरज 
जिल्ह्यात महापुरामुळे पिके वाया गेली आहेत. भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊस पिकानेही नांगी टाकली आहे. त्यामुळे यावर्षी सरसकट सर्वच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने याबाबतीत पंचनाम्यासंदर्भात उशीर न लावता शेतकऱ्यांना तत्काळ शेतावरच नुकसानभरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पोवार यांनी "सकाळ'शी बोलताना केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods Farmer suicide due to crop damage