शहरात हेल्मेटला वाहनधारकांचा विरोधच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

पार्किंग, वाहतुकीचे प्रश्‍‍न दुर्लक्षित सक्ती केवळ दंडासाठीच

पार्किंग, वाहतुकीचे प्रश्‍‍न दुर्लक्षित सक्ती केवळ दंडासाठीच
कोल्हापूर - शहरात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना हेल्मेटसक्ती नकोच, अशाच भावना वाहनधारकांतून पुढे येत आहेत. पोलिसांनी हेल्मेटसक्तीचा अजेंडा घेऊन प्रवाशांची लूट चालवली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. एकीकडे नंग्या तलवारी नाचवत भरदिवसा हल्ले होत आहेत. एकतर्फी प्रेमातून हल्ले होत आहेत. मटका, जुगार तर आता अधिकृतच असल्यासारखी अवस्था झाली आहे. त्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष करून पोलिसांनी शहरातही हेल्मेटसक्तीचा प्रयत्न सुरू केल्यामुळे वाहनधारकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे नाव वापरून त्यांच्या आणि हेल्मटसक्तीविरोधातील मॅसेज आता सोशल मीडियावर फिरत आहेत.

सक्ती नव्हे लूटच 
अजित लटके - शहरातील इतर महत्त्वाचे प्रश्‍न सोडून पोलिस हेल्मेटसक्ती सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. सक्ती म्हणजे केवळ आर्थिक लुटीचाच प्रकार आहे. वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करायचे आणि दंडाची पावती फाडायला मिळते म्हणून हेल्मेटसक्तीची, ही भूमिका योग्य नाही.

हेल्मेटसक्तीप्रमाणेच इतर कायदे त्यांनी पाळावेत. त्यांचे कर्तव्य जरी त्यांनी व्यवस्थित पार पाडले, तरीही अपघाताचे प्रमाण कमी होईल. यासाठी किमान शहरात तर हेल्मेटचा दिखावा करायची गरज नाही, असे वाटते.

नको तेथे अतिरेक 
समीर कुलकर्णी - महामार्गावर हेल्मेटसक्ती योग्य आहे; मात्र शहरात त्याची अंमलबजावणी अशक्‍य आहे. पोलिसांनी नको तेथे अतिरेक करू नये. शहरात फिरताना हेल्मेट हाताळणे अशक्‍य आहे. हेल्मेटमुळे अपघात होत नाहीत, असे नाही. पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी शिस्त लावण्याचे काम पहिला करावे. हेल्मेटसक्ती अयोग्य असल्यामुळेच वाहनधारकांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत विरोध होत आहे. याचा विचार करावा, अन्यथा होणारा उद्रेक पोलिसांना महागात पडेल.

आधी शिस्त लावा
प्रवीण कोपार्डे - शहरात हेल्मेटसक्ती करून पोलिसांना नेमके काय मिळणार आहे, हेच समजत नाही. महामार्गावरील हेल्मेटसक्ती एक वेळ समजू शकतो; शहरात अनेक ठिकाणी फिरावे लागते. जेथे दुचाकी पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही, तेथे हेल्मेट कसे हाताळणार? पोलिसांनी ज्या कार्यालयात जाईल तेथे हेल्मेट ठेवण्याची आणि त्याच्या सुरक्षेची हमी घ्यावी, आयएसआय मार्क हेल्मेटचा पुरेपूर साठा अल्पदरात शहरात करावा, त्यानंतर शहरात हेल्मेटसक्तीचा विचार करावा.

कोंडी सोडवा
महेंद्र चव्हाण - शहरात हेल्मेटसक्ती म्हणजे पोलिसांची मनमानी सहन करावी लागेल. चोऱ्या होत आहेत, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे. शहरात प्रमुख रस्त्यांवर दुचाकी चालविणेही अवघड झाले असून, तेथे हेल्मेट कसे बाळगणार? हेल्मेट घालून चेन स्नॅचिंग होत आहेत, त्याच्यामुळे सीसीटीव्हीचाही फायदा पोलिसांना होत नाही. शहरात हेल्मेटसक्ती करण्यापेक्षा पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडीसह इतर प्रश्‍न सोडवावेत, असे वाटते.
 

शहरात सक्ती नको
श्रीधर वष्ट -शहरात दुचाकी वाहनधारकांना हेल्मेटसक्ती होणार असल्याचे समजते. महामार्ग, राज्य मार्गावर दुचाकी वाहनांसाठी हेल्मेटसक्ती असणे योग्यच आहे. तथापि शहरात रस्त्यावर असणारे खड्डे, रहदारीचे वाढते स्वरूप, अधूनमधून असणारे स्पीड ब्रेकर व सिग्नल्स यामुळे खरेतर वेगावर आपोआपच नियंत्रण येत असते. त्याशिवाय बाजारहाट-खरेदीसाठी जाताना हेल्मेट हाताळणे अडचणीचे होणार आहे. या सर्वांचा विचार करून हेल्मेट हा विषय शासनाने ऐच्छिक ठेवावा, असे वाटते.

सोशल मीडियावरील वाहनधारकांचे प्रश्‍न
रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांमुळे होणारी कोंडी कमी करावी
पोलिस दुचाकीवरून जाताना मोबाइलवर बोलतात ते रोखावे
पोलिसांच्या वाहनांवर फॅन्सी क्रमांकावर कारवाई करा.
चुकीच्या ठिकाणी पार्किंग कधी थांबणार
मध्यवर्ती बस स्थानकाजवळील वाहतूक कोंडी कधी फुटणार?
खासगी मालकीच्या जनावरांचा मुक्त वावर कोण थांबवणार
पोलिस व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा सक्ती करावी
सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांना शिस्त लावावी
मोबाइलवर बोलत वाहन चालवणाऱ्या पोलिसांना रोखावे
सिग्नलला डाव्या बाजूला वळण्यासाठी रस्ता रिकामा नसतो
वळण घेताना हात काढणे किंवा वाहनाचा सिग्नल दिला जात नाही, त्यामुळे अपघात होतात, याबाबत जनजागृती व्हावी
हेल्मेटने अपघातात मृत्यू होणार नाही, याची खात्री काय?
हेल्मेट असूनही मृत्यू झाल्यास हेल्मेट कंपनी आणि संबंधित विमा कंपनी कुटुंबीयांना दुप्पट नुकसानभरपाई देणार काय?

मूळ हेतू साध्य होईल का?
१५ जुलैनंतर शहरात थेट हेल्मेटसक्ती होण्याच्या धास्तीने अनेक वाहनचालकांनी मिळेल तिथे हेल्मेट खरेदी करण्याचा धडाका लावला आहे. काही दुकानदार विक्रीची पावतीही देत नाहीत. त्यामुळे जीएसटी भरण्याचा विषय तर दूरच. याचबरोबर रस्त्याकडेला बसलेले विक्रेते आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट दीड-दोनशे रुपयांना विकत आहेत. अशा तकलादू हेल्मेटमुळे दंडात्मक कारवाई टळेल, पण सक्तीमुळे सुरक्षिततेबाबतचा मूळ हेतू साध्य होईल का?

Web Title: kolhapur helmet Helmets in the city are opposed to the vehicle holders