कोल्हापुरात दिग्गजांचा आज भाजपमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

१९९५-९९ काळात युती शासनात रोजगार हमी योजनेचे मंत्री असलेले व यावेळच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज नेलेले भरमू पाटील भाजपमध्ये रितसर प्रवेश करत आहेत. त्यांच्यासह तालुक्‍यातील २०० कार्यकर्त्यांचा जंगी प्रवेशही यावेळी होणार आहे. कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी शिक्षण समिती सभापती अजिंक्‍य चव्हाण, त्यांचे बंधू व कार्यकर्ते यांचाही प्रवेश होणार आहे.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही काँग्रेसचे दिग्गज नेते भाजप किंवा शिवसेनेत करत असलेल्या प्रवेशाचे लोण कोल्हापूर जिल्ह्यातही येऊन पोहोचले आहे. आज (ता. २८) होणाऱ्या भाजपच्या मेळाव्यात जिल्ह्यातील दिग्गज नेते भाजपत प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी दहा वाजता मेळावा होत आहे. 

विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवून सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीलाच राज्यात खिंडार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नगरचे आमदार संग्राम जगताप, वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड, राणा जगजितसिंह अशा अनेकांचा भाजप प्रवेश निश्‍चित असताना या पक्षांतराचे पडसाद जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. 

१९९५-९९ काळात युती शासनात रोजगार हमी योजनेचे मंत्री असलेले व यावेळच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज नेलेले भरमू पाटील भाजपमध्ये रितसर प्रवेश करत आहेत. त्यांच्यासह तालुक्‍यातील २०० कार्यकर्त्यांचा जंगी प्रवेशही यावेळी होणार आहे. कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी शिक्षण समिती सभापती अजिंक्‍य चव्हाण, त्यांचे बंधू व कार्यकर्ते यांचाही प्रवेश होणार आहे. भाजपचा मेळावा हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी इतर पक्षांतील दिग्गजांच्या प्रवेशानेच गाजण्याची शक्‍यता आहे. 

या मेळाव्याची जंगी तयारी पक्षाच्या पातळीवर सुरू आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे यांच्याकडून संभाव्य भाजप प्रवेश करणाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सभागृहात वेळेवर आणण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक विजय खाडे-पाटील, विजय जाधव या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांकडून नियोजन सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur important leaders enter BJP today