Kolhapur Loksabha 2019 : टक्का घटला; धक्का कुणाला?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

एक नजर

  • गेल्या निवडणुकीत कोल्हापुरात ७२.०४, तर हातकणंगलेमध्ये ७३.०५ टक्के मतदान
  • या निवडणुकीत दोन्हीही मतदारसंघांत किमान ७० ते ७१ टक्के मतदान 
  • या वेळच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत एकूण मतदानाची टक्केवारी एक ते दोन टक्‍क्‍यांनी घटली
  • घटलेला टक्का कुणाला धक्का देणार, याविषयी उत्सुकता

कोल्हापूर -  या वेळच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत एकूण मतदानाची टक्केवारी एक ते दोन टक्‍क्‍यांनी घटली आहे. घटलेला टक्का कुणाला धक्का देणार, याविषयी उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत कोल्हापुरात ७२.०४, तर हातकणंगलेमध्ये ७३.०५ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत दोन्हीही मतदारसंघांत किमान ७० ते ७१ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मतांची टक्केवारी घटली असली, तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतदारांची संख्या वाढली आहे, त्यामुळे मतदानही वाढले. २०१४ च्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १२ लाख ५८ हजार ९८६, तर हातकणंगले मतदारसंघात ११ लाख ८७ हजार ५२ मतदान झाले होते. दोन्ही ठिकाणी किमान ५० ते ६० हजार मते या निवडणुकीत वाढण्याची शक्‍यता आहे. 

निवडणुकीत मतांची टक्केवारी महत्त्वाचा विषय आहे. एखाद्या निवडणुकीत मग ती संस्थेची असो किंवा ग्रामपंचायतीची प्रस्थापितांविरोधात लाट असेल तर उच्चांकी मतदान होते, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. या वेळच्या लोकसभेत जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत प्रचंड चुरस आणि ईर्ष्या होती. ईर्ष्येपोटी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात मतदान बाहेर काढून मतांची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात गेल्या निवडणुकीपेक्षा एक-दोन टक्के मतदान कमीच झाले. आता कमी झालेले मतदान कुणाचा घात करणार आणि कुणाला तारणार, याविषयी उत्सुकता असेल. 

गेल्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये १७ लाख ४७ हजार ४२१ मतदार होते. पैकी १२ लाख ५८ हजार ९८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी याच मतदारसंघात १८ लाख ७४ हजार ३४५ मतदार आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल एक लाख ३० हजार मतदार जास्त आहेत. त्यामुळे या वेळी किमान मतदान १३ लाखांच्या आसपास जाईल. हातकणंगलेमध्ये गेल्या वेळी १६ लाख २४ हजार ९३३ पैकी ११ लाख ८७ हजार ५२ मतदारांनी मतदान केले. या वेळी येथे १७ लाख ७२ हजार ५६३ मतदार आहेत.

गेल्या वेळच्या तुलनेत सुमारे दीड लाख मतदार वाढले आहेत. परिणामी, मतदानही १३ लाखांपुढे जाईल, असा अंदाज आहे. आतापर्यंत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मतदारसंघांत ७० ते ७१ टक्के मतदान होईल, असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी कमी दिसत असली, तरी मतदान मात्र वाढले आहे. टक्का घटल्याने कुणाला तरी धक्का बसेलच; पण वाढीव मतदानही कुणाच्या पारड्यात जाणार, हेही महत्त्वाचे आहे.

बहिष्काराचा परिणामही दिसणार
कोल्हापूर मतदारसंघात समाविष्ट धामणी खोऱ्यातील सुमारे ४५ गावांनी आज मतदानावर बहिष्कार घातला. पैकी पाच ते सात गावांत मतदान झाले; पण न झालेल्या गावांतील मतांचा आकडा सुमारे २५ ते ३० हजार आहे. हे न झालेले मतदानही विजयावर परिणाम करू शकते.

Web Title: Kolhapur Loksabha 2019 voting