कोल्हापूरः उपमहापाैरपद न मिळाल्याच्या रागातून आत्महत्येचा इशारा

युवराज पाटील
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कोल्हापूर - काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी आग्रही असलेल्या अशोक जाधव यांनी त्यांना पद न मिळाल्याच्या रागातून आत्महत्येचा इशारा दिला अन्‌ त्यांची समजूत काढताना दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांच्या नाकी नऊ आले. आमदार सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्‍यतारा’ या कार्यालयात या नाट्यमय घडामोडी घडल्या. 

कोल्हापूर - काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी आग्रही असलेल्या अशोक जाधव यांनी त्यांना पद न मिळाल्याच्या रागातून आत्महत्येचा इशारा दिला अन्‌ त्यांची समजूत काढताना दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांच्या नाकी नऊ आले. आमदार सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्‍यतारा’ या कार्यालयात या नाट्यमय घडामोडी घडल्या. 

बावड्यातून सातत्याने महापालिकेवर प्रतिनिधित्व करणारे श्री. जाधव यावेळी उपमहापौर पदासाठी आग्रही होते. त्यांच्याकडे शिक्षण सभापतिपद असतानाही ते उपमहापौरपदासाठी हटून बसले होते. पूर्वी जनसुराज्य-राष्ट्रवादी विरुद्ध ताराराणी आघाडी असा संघर्ष होता, त्यावेळी जाधव ताराराणी-आघाडीच्या हाताला लागले होते. शिक्षण सभापतिपद नाइलाजाने घेतले, आपण तयार झालो नसतो, तर भाजप-ताराराणी आघाडीकडे पद गेले असते असा जाधव यांचा दावा होता.

दोन्ही काँग्रेसच्या बैठकीतही जाधव हे डॉ. डी. वाय. पाटील यांचे मानसपुत्र आहेत, त्यांनी मनात आणले तर ते सरांना एखादे कॉलेजही देऊन टाकतील, असे आमदार पाटील म्हणाले होते.

पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा इशारा
काल दुपारी चारजणांचे अर्ज भरल्यानंतर नेमका कुणाचा अर्ज दाखल करायचा, अशी विचारणा काँगेस गटनेत्यांनी आमदार पाटील यांच्याकडे केली. पाटील सध्या बंगळूर येथे आहेत. त्यांनी भूपाल शेटे यांचे नाव निश्‍चित केल्यानंतर जाधव नाराज झाले. आपण पाचव्या मजल्यावर जाऊन उडी मारून आत्महत्या करणार असल्याचे सांगताच दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांची धावपळ उडाली. 

राष्ट्रवादीच्या वाट्याचे पद घ्या; पण...
प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख यांनी श्री. जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पुढील वेळी राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारे उपमहापौरपद तुम्हाला देतो; पण असे काही करू नका, असे सांगत होते. अर्ज भरण्याची पाचची वेळ जवळ येत होती. साडेचार वाजून गेले, तरी उमेदवार अजून कसे आले नाहीत, असा प्रश्‍न थांबलेल्यांना पडला.

लाटकर यांना कात्रजचा घाट

शह-काटशहाच्या राजकारणात राजू लाटकर यांना आमदार हसन मुश्रीफ यांनी अखेर कात्रजचा घाट दाखविला. लाटकर हे मुश्रीफ यांचे निष्ठावंत शिलेदार समजले जातात; मात्र नंदकुमार मोरे यांच्या पत्नी सरिता मोरे यांना महापौरपदी संधी द्यावी यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक आग्रही होते. त्याची दखल घेत मुश्रीफ यांनी मोरे यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. 

पुढील सहा महिन्यांत लाटकर यांच्या पत्नी ॲड. सूरमंजिरी लाटकर यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. नेते त्यांच्या सोयीनुसार निष्ठावंताला कशी भूमिका घ्यावयास लावतात व त्याची झळ राजकारणाला बसते, याची प्रचिती या निमित्ताने आली. मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत लाटकर यांनी उघडपणे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात भूमिका घेतली. ‘लोकसभेसाठी महाडिक हे उमेदवार नको’, असे लाटकर यांनी सांगितले होते. मोठ्यांच्या भांडणात लहानांनी पडायचे नसते, असे म्हटले जाते. लाटकर कारण नसताना या प्रक्रियेत ओढले गेले. पूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, स्थायी सभापती अशी पदे दिली असताना त्यांना आणखी किती पदे देणार, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुश्रीफ यांच्याकडे केली. 

मुश्रीफ यांनी शब्द पाळला
नंदकुमार मोरे हे काही मूळ राष्ट्रवादीचे नाहीत. २०१५ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सरिता अवघ्या पाच मतांनी विजयी झाल्या. मोरे हे अनुभवी माजी नगरसेवक आहेत. खोलखंडोबा, शनिवार पेठ तसेच बुधवार पेठ परिसरात त्यांचा संपर्क आहे. त्याची दखल घेत राष्ट्रवादीने मोरे यांच्या पत्नी सरिता यांना संधी दिली. अटीतटीच्या लढतीत मोरे विजयी झाल्या. पत्नीला महापौर केले नाही तर आयुष्यात निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका मोरे यांनी घेतली होती. आमदार मुश्रीफ यांनी सत्ता आल्यास महापौरपदाची संधी देऊ, असा शब्द दिला होता. तो शब्द मुश्रीफ यांनी उमेदवारीच्या रूपाने खरा केला.

Web Title: Kolhapur Mayor, Deputy Mayor election