कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी डॉ. कलशेट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

माझे शिक्षण शिवाजी विद्यापीठात झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर मला नवे नाही. लोकसहभागातून सुशासन देण्यावर भर राहील. आतापर्यंत जिल्हा परिषद, महसूल व मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. त्याचा कोल्हापुरात काम करताना फायदा होईल.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नूतन आयुक्त

कोल्हापूर - महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यांच्या जागी कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची नियुक्ती झाली. नूतन आयुक्त डॉ. कलशेट्टी सोमवारी (ता. २५) पदभार स्वीकारणार आहेत.

पालिकेची सभा सुरू असतानाच दुपारी आयुक्त डॉ. चौधरी यांना सांगली जिल्हाधिकारीपदी बदली झाल्याचा नगरविकास विभागाकडून ई-मेलवरून आदेश आला. आयुक्तांच्या बदलीची बातमी महापालिका वर्तुळात पसरली. याचा महासभेवरही परिणाम झाला. थेट पाईपलाईवरून तापलेले वातावरण काहीसे निवळले. सभा संपल्यानंतर महापौर सरिता मारे यांच्यासह 
पदाधिकारी व नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. चौधरी यांना शुभेच्छा दिल्या.

आयुक्त चौधरी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे रुपडे पालटले. शासनाकडून या रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजना लागू करून घेतली. चौधरी यांच्या कारकीर्दीतले हे सर्वांत महत्त्वाचे काम होय. झीरो पेंडन्सी उपक्रम राबवून प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयोग केला. कडक शिस्तीसाठी डॉ. चौधरी परिचित होते.

नूतन आयुक्त डॉ. कलशेट्टी शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी यापूर्वी खेड व सातारा येथे गटविकास अधिकारी, सांगली जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालयात उपसचिव, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर काम केले आहे.

माझे शिक्षण शिवाजी विद्यापीठात झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर मला नवे नाही. लोकसहभागातून सुशासन देण्यावर भर राहील. आतापर्यंत जिल्हा परिषद, महसूल व मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. त्याचा कोल्हापुरात काम करताना फायदा होईल.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
नूतन आयुक्त

कोल्हापुरात काम करताना विशेष आनंद झाला. राजर्षी शाहूंच्या सामाजिक विचारांचा जागर करणाऱ्या येथील लोकांना मी आयुष्यात विसरणार नाही. लोकप्रतिनिधींची समाजकार्याप्रतीची तळमळही प्रकर्षाने जाणवली. येथील कामाच्या अनुभवाचा भविष्यातील करिअरमध्ये लाभ होईल. 
- डॉ. अभिजित चौधरी,
आयुक्त

Web Title: Kolhapur Municipal Commissioner Dr. Mallinath Kalshetty