कोल्हापूरः महापौरपदी सरिता मोरे निश्‍चित

कोल्हापूरः महापौरपदी सरिता मोरे निश्‍चित

कोल्हापूर - भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळाचे गणित जमत नसल्याने महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांची निवड निश्‍चित झाल्याचे बोलले जाते. भाजप-ताराराणी आघाडीने आज अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले; मात्र सत्तारूढ आघाडीतील सदस्य हाताशी लागणार नाहीत, तसेच शिवसेनेनेही तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने भाजप-ताराराणी आघाडीला दोन पावले मागे यावे लागले.

आज (ता. १०) सकाळी अकरा वाजता महापालिका सभागृहात निवडीच्या प्रक्रियेस सुरवात होईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली निवड होईल. नगरसेवक अपात्र होण्याचे आदेश आजही प्राप्त न झाल्याने दोन्ही काँग्रेसला दिलासा मिळाला; मात्र उद्या सकाळी आदेश येऊन थडकले तर अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. निवडीच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये 

यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. सदस्यांशिवाय मुख्य इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही. नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश निघाल्यास दोन्ही काँग्रेसचे संख्याबळ ३७ इतके होते. त्याच वेळी भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळ ३२ इतके होते. तसे आदेश न निघाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या ४१ तर विरोधी आघाडीची ३३ इतकी होते. शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या अश्‍विनी रामाणे यांच्यासमोर जातीच्या दाखल्याचा प्रश्‍न असल्याने त्या मतदानाला येण्याची शक्‍यता आहे.

अपात्रतेचा आदेश प्राप्त झाला अथवा न झाला तरी दोन्ही काँग्रेसच्या संख्याबळावर काही फरक पडत नाही. सरिता मोरे यांचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने गेल्या दोन दिवसांत राजकीय फासे टाकून पाहिले. शिवसेनेचे चार सदस्य त्यांच्या हाती लागले असते आणि अपात्रतेचा आदेश निघाला असता तर महापौर निवडीत चमत्कार होऊ शकला असता. मात्र आदेश निघतील की नाही याची संभ्रमावस्था आजही कायम राहिली.

एक वर्षानंतर पाच नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्र दिल्याने पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचे आदेश निघतात याकडे लक्ष लागून राहिले होते. काँग्रेसचे डॉ. संदीप नेजदार, दीपा मगदूम, वृषाली कदम. राष्ट्रवादीचे सचिन पाटील, भाजपचे संतोष गायकवाड यांच्यासंबंधी कोणता निर्णय होतो यावर राजकीय घडामोडी अवलंबून होत्या. विधी व नगरविकास विभागाच्या स्तरावर ही बाब विचाराधीन असून पाचही नगरसेवकांची फाईल मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितले होते.

राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे, अजिंक्‍य चव्हाण यांचे नगरसेवकपद पक्षांतरबंदी कायद्यामुळे रद्द झाले आहे. 
सत्तारूढ आघाडीचे सदस्य आंबा मुक्कामी आहेत. विरोधी आघाडीचे खंबाटकी घाट परिसरात तर शिवसेनेचे महाबळेश्‍वर येथे आहेत. आज सकाळी दाखल होतील. आंबा येथे नेत्यांनी सदस्यांशी संवाद साधला. दोन्ही काँग्रेसकडून महापौरपदासाठी सरिता मोरे, उपमहापौर पदासाठी भूपाल शेटे, भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी जयश्री जाधव, उपमहापौरपदासाठी भूपाल शेटे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

पोलिस अधीक्षकांकडून पाहणी
आठ दिवसांपासून महापौर निवडीच्या संबंधी राजकीय विधाने त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असा दिलेला इशारा यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महापालिकेस भेट देऊन निवड प्रक्रियेची माहिती घेतली. महापौर निवडीच्या निमित्ताने पोलिस अधीक्षकांनी येथे येण्याची पहिलीच वेळ असावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com