आम्हीही शिवीगाळ करावी का? - कोल्हापूर पालिकेत नगरसेविकांचा सवाल

आम्हीही शिवीगाळ करावी का? - कोल्हापूर पालिकेत नगरसेविकांचा सवाल

कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला.

महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्याने अखेर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रभागाची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्येचा विचार करून नव्याने कर्मचाऱ्यांची विभागणी करू, असे आश्‍वासन दिल्यानंतर संतप्त नगसेविका शांत झाल्या. 

कर्मचारी संख्येबाबत नगरसेविका ललिता बारामते यांनी प्रथम प्रश्‍न उपस्थित केला. प्रभागात साफसफाईसाठी कर्मचारी कमी आहेत. एखाद्या प्रभागात आठ ते दहा कर्मचारी व एखाद्या प्रभागात 20 ते 25 कर्मचारी...अशी असमानता का? अशी विचारणा करत त्यांनी या विषयाला वाचा फोडली. 

"जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, दादागिरी करतो, त्याच्या प्रभागात जादा कर्मचारी; पण जे शांत बसतात, त्यांच्या प्रभागात कमी कर्मचारी आहेत. माझ्या प्रभागातील एक कर्मचारी मयत झाला. दुसरा कर्मचारी मिळाला नाही. झोपडपट्टी विभाग असूनही आमच्याकडे दोन ते तीन माणसेच का दिली? आम्ही शिव्या देत नाही म्हणून आम्हाला कर्मचारी मिळत नाहीत का? मग आम्हीही शिवीगाळ करावी का?'' 

- रूपाराणी निकम

सत्यजित कदम म्हणाले, ""आयुक्त कलशेट्टी यांनी शहरात स्वच्छता मोहिमेत लोकसहभाग वाढविला, ही कौतुकाची बाब आहे; पण आपले कर्मचारी काम करत नाहीत. गळ्यात चेन, कडी घालून कर्मचारी फिरतात. त्यांना कामाला लावा, कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. अधिकाऱ्यांच्या घरात तीन महिला कर्मचारी कामाला आहेत, हे कशासाठी? त्यांना हौस असेल तर 25 - 30 हजार पगार घेणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना कामाला ठेवण्यापेक्षा त्यांना वर्गणी काढून आम्ही पैसे देतो.'' 

किरण नकाते म्हणाले, ""स्वंयघोषित मुकादमांवर कारवाई करा, मुकादम म्हणून मिरविताना हे कर्मचारी कामच करत नाहीत.'' 

""माझ्या प्रभागात 15 कामगार आहेत, चार ते पाच दररोज रजेवर असतात. ड्यूटी सकाळी सहाला असते. येतात साडेसातला साडेनऊला जेवायला जातात. दोन वाजता पंचिंग करून घरी जातात.''

- राजसिंह शेळके  

तौफिक मुल्लाणी म्हणाले,""स्विपिंग मशिन बंद करायला पाहिजे, ते बोगस आहे. महापालिकेवर हा बोजा आहे.'' यावर आयुक्त म्हणाले, ""स्विपिंग मशिनबाबतचा निर्णय मी घेतला आहेच. आता कर्मचारी वाटपाचा समान निर्णय घेतला जाईल.'' 

दिलीप पोवारांचा इशारा 
सभागृह नेते दिलीप पोवार शिक्षण मंडळावर बोलत होते. पदाधिकाऱ्यांनी व आयुक्तांनी लक्ष घातल्याने बंद पडणाऱ्या सावित्रीबाई फुले दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळा भाड्याने देण्यापेक्षा सर्वांनी लक्ष घालून, या शाळा चांगल्या करण्याचा प्रयत्न करूया. पोवार हा विषय मांडत असतानाच काही सदस्यांचा गोंधळ सुरू झाल्याने पोवार यांच्या बोलण्यात व्यत्यय येऊ लागला. त्यामुळे पवार भडकले. अडथळा आणणाऱ्यांना शिवीगाळ करू, बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी सभागृहातच दिला. यावेळी शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, सत्यजित कदम यांनी पोवार यांना समजविण्याचा प्रयत्न केला. 

कनाननगर जागा "रहिवासी'त आणण्याचा प्रस्ताव 
कनाननगर झोपडपट्टी ही घोषित आहे, या झोपडपट्टीची जागा ही सार्वजनिक, निमसार्वजनिक क्षेत्र आहे. कोईमार ट्रस्टच्या मालकीची ही जागा आहे. ही झोपडपट्टी घोषित असल्याने व महापालिकेने या विभागाच्या विकासावर कोट्यावधी रुपये खर्च झाल्याने ही जागा रहिवास विभागात समाविष्ट करावी, असा प्रस्ताव नगररचना विभागाने सभागृहाच्या मंजुरीसाठी ठेवला आहे. या प्रस्तावाच्या बाजूने स्थानिक नगरसेवक पोवार यांनी बाजू मांडली, हा विषय वैयक्तिक हिताचा नाही, सार्वजनिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे मंजूर करावा, असे मत त्यांनी मांडले; पण पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने हा विषय पुढील सभेसाठी ठेवला. 

नगरसचिवांवर ठाणेकर भडकले 
"किती ठरावांची अंमलबजावणी झाली?' असे विचारत नगरसेवक अजित ठाणेकर हे नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे आकडेवारी मागत होते. यावेळी कांरडे हसले. त्यामुळे ठाणेकर संतप्त झाले. सभागृहाची तुम्ही चेष्टा लावली आहे का? हसायला काय झाले. सदस्य ठरावाला प्रशासन केराची टोपली दाखविता, हा नगरसेवकांचा अपमान आहे, असे म्हणत ठाणेकर यांनी कारंडे यांना फैलावर घेतले. 

भूमिगत वाहिन्यांवरून वादावादी 
महावितरण कंपनीतर्फे शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठी परवानगी देण्याचा विषय सभागृहासमोर आला होता. प्रा. जयंत पाटील यांनी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे निधी परत गेला का? अशी विचारणा केली. शहर अभियंता सरनोबत यांनी परवानग्या दिल्या असे सांगितले. यावेळी सत्यजित कदम यांनी परवाने देताना यांची दिरंगाई असते, त्यामुळे पैसे परत गेल्याचे सांगितले. बापट कॅम्प येथील कामांना परवानगी द्याच. तेथे लोकांच्या जिवाला धोका निर्माण होऊि शकतो. ही कामे तटवू नका, असे म्हणत त्यांनी सरनोबत यांना धारेवर धरले. शारंगधर देशमुख यांनी संबंधित ठेकेदारांकडून डिपॉझिट भरूनच परवानगी द्या, असे मत मांडले. 

पोषण आहाराची कामे बचतगटांना द्या 
शालेय पोषण आहाराची कामे बचतगटांनाच द्या, अशी मागणी माधवी लाड यांनी केली. सेंट्रल किचनमुळे बचतगटांच्या महिलांवर अन्याय होणार आहे, असे त्यांनी सांगितले. सेंट्रल किचन हा शासनाचा आदेश असल्याचे प्रशासनाने सांगितले. यावर नगरसेवकांनी फेरटेंडर करून महिला बचतगटांनाच ही कामे द्या, असे मत मांडले. 

लोकांचा जीव गेल्यावर जाग येणार का? 
संभाजीनगर कामगार चाळीची इमारत धोकादायक आहे. 80 कुटुंबे येथे राहतात. प्रधानमंत्री आवास योजनेत हे प्रकरण मंजूर झाले नाही. चार वर्षे मी याचा पाठपुरावा करत आहे. लोकांचा जीव गेल्यावर तुम्हाला जाग येणार का? असा प्रश्‍न संतोष गायकवाड यांनी उपस्थित केला. ही जागा महापालिकेची असल्याने तांत्रिक अडचणीमुळे म्हाडाने प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रकल्पाला नांमजुरी दिली आहे. बीओटीतून हा प्रकल्प करू, असे आश्‍वासन आयुक्त कलशेट्टी यांनी दिले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com