कोल्हापूरः एलईडी दिव्यांची कंपनी मनपाची जावई आहे का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

कोल्हापूर - शहरात एलईडी दिवे बसविणारी कंपनी महापालिकेची जावई आहे का? एलईडी दिव्यांची व्यवस्था केवळ मंत्री, आमदार, खासदारांसाठीच आहे का? अधिकारी, नगरसेवकांना ही कंपनी जुमानतच नाही. कमी व्हॅटचे दिवे बसविले जातात. बंद दिवे लवकर सुरू केले जात नाहीत. त्यांना एवढी कसली घमेंड आहे? महापालिकेच्या सभेत येऊन कंपनीने नगरसेवकांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असा सज्जड दम महापालिकेच्या सभेत  संतप्त नगरसेवकांनी दिला.

कोल्हापूर - शहरात एलईडी दिवे बसविणारी कंपनी महापालिकेची जावई आहे का? एलईडी दिव्यांची व्यवस्था केवळ मंत्री, आमदार, खासदारांसाठीच आहे का? अधिकारी, नगरसेवकांना ही कंपनी जुमानतच नाही. कमी व्हॅटचे दिवे बसविले जातात. बंद दिवे लवकर सुरू केले जात नाहीत. त्यांना एवढी कसली घमेंड आहे? महापालिकेच्या सभेत येऊन कंपनीने नगरसेवकांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असा सज्जड दम महापालिकेच्या सभेत  संतप्त नगरसेवकांनी दिला. महापौर माधवी गवंडी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. एलईडी दिवे बसविणाऱ्या ठेकेदार कंपनीला शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत पाठीशी घालतात, असा आरोपही नगरसेवकांनी सभेत केला.

शहरातील एलईडी दिव्यांबाबत आज महापालिकेची विशेष सभा आयोजित केली होती; पण या  ठेकेदार कंपनीचा जबाबदार प्रतिनिधी उपस्थित नव्हता. महापालिका अधिकाऱ्यांच्या उत्तराने आमचे समाधान होणार नाही, ठेकेदार कंपनीच्याच अधिकाऱ्यांना बोलवा, असा आग्रह नगरसेवकांनी धरला. त्यामुळे स्वत: आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी या कंपनीच्या  प्रतिनिधीशी थेट संवाद साधला व येत्या सर्वसाधारण सभेदिवशी त्यांना उपस्थित राहण्याची सूचना केली. 

शारंगधर देशुमख म्हणाले, हा कोण मस्तवान ठेकेदार आहे, सभागृह, महापौर, अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. तो काय कोणाचा जावई आहे का? शहर आणि उपनगरात दिवे बसविताना काळजी घ्यायला हवी. उपनगरात रस्ते मोठे आहेत, प्लॉट मोठे आहेत. तेथे ३५ व्हॅटच्या दिव्यांचा प्रकाश कामाचा नाही. रस्त्यावर अंधारच पडतो. शहरात ३५०० दिवे आमदार, खासदार तसेच नगरसेवकांच्या ऐच्छिक निधीतून बसविले आहेत. या दिव्यांच्या बचतीचाही हिशेब करा. मेहजबीन सुभेदार म्हणाल्या, दोन, दोन महिने पाठपुरावा करूनही या कपंनीचे लोक येत नाहीत. आले तर नीट उत्तरे देत नाहीत.

किरण शिराळे म्हणाले, एलईडी दिवे बसणार म्हणून आहे ते खांबावरील दिवेही काढून नेले. दोन महिने प्रभागात अंधार आहे. एलईडी राहू दे, आमचे पूर्वीचे दिवे बसवा.

प्रा. जयंत पाटील म्हणाले, पूर्वीचे दिवे व इतर साहित्य याच्या नोंदी ठेवाव्यात, अन्यथा महापालिकेचे नुकसान होईल. जुन्या दिव्यांचे काय केले? याची माहिती हवी. ठेकेदार कंपनी ही शहरावर लादली आहे. आम्ही त्याला स्वीकारले असले, तरी काम नगरसेवकांच्या दृष्टीने समाधानकारक हवे. शहरात प्राधान्यक्रमाने दिवे बसवायला हवेत. 

सत्यजित कदम म्हणाले, ठेकेदार कंपनीने सभागृहात येऊनच नगरसेवकांच्या प्रश्‍नाची उत्तरे द्यावीत. उपनगरात विजेच्या खांबाचे अंतर जास्त आहे. त्यामुळे दिवे बसविण्याचे नियोजन या सर्व बाबी लक्षात घेऊनच करायला हव्यात. नगरसेवकांच्या प्रश्‍नांना शहर अभियंता सरनोबत उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांनाही नगरसेवकांनी धारेवर धरले. 

देशमुख यांनी सरनोबत यांच्यावर तुम्ही ठेकेदाराला का पाठीशी घालता ? तुम्ही त्या ठेकेदाराच्या मिंद्यात आहात का? त्यांची मध्यस्थी करू नका, असे सांगितले. भूपाल शेटे म्हणाले, महापालिकेच्या दिव्यांचा हिशोबही ठेकेदाराने ठेवावा. 
.............
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Municipal corporation meeting report