रंकाळ्यावर उद्या वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

कोल्हापूर - कदंब आणि बोधीवृक्षासह गेल्या सात वर्षांत रंकाळ्यावर लावलेल्या प्रत्येक रोपाची जपणूक चांगल्या पद्धतीने झाली असून, पानं, फुलं आणि फळांनी ती आता बहरली आहेत. एकमेकांशी आनंदाने हितगुज साधणाऱ्या या झाडांचा वाढदिवस आणि नव्याने वृक्षारोपणाचा उपक्रम मंगळवारी (ता. १२) होणार आहे.

कोल्हापूर - कदंब आणि बोधीवृक्षासह गेल्या सात वर्षांत रंकाळ्यावर लावलेल्या प्रत्येक रोपाची जपणूक चांगल्या पद्धतीने झाली असून, पानं, फुलं आणि फळांनी ती आता बहरली आहेत. एकमेकांशी आनंदाने हितगुज साधणाऱ्या या झाडांचा वाढदिवस आणि नव्याने वृक्षारोपणाचा उपक्रम मंगळवारी (ता. १२) होणार आहे. रंकाळा ग्रुपच्या सहकार्याने रंकाळ्यावर सकाळी सातला हा उपक्रम होणार असून, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रंकाळा ग्रुप व ‘सकाळ’ परिवाराने केले आहे. दरम्यान, महापौर शोभा बोंद्रे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.   

रंकाळा ग्रुपच्या पुढाकाराने रंकाळ्याच्या सर्वांगीण संवर्धनाचा प्रकल्प हाती घेतला आणि या प्रकल्पांतर्गत पहिले पाऊल म्हणून १२ जून २०११ ला रंकाळ्यावर दुर्मीळ वृक्षांची लागवड करण्यात आली. येथे विविध पक्षी यावेत, त्यांना या झाडांवरच अन्न मिळावे आणि त्याच वेळी कोल्हापूरकरांना शुद्ध प्राणवायू मिळावा आणि रंकाळा एक पक्षीतीर्थ म्हणून नावारूपास यावा हाच या उपक्रमामागचा उद्देश होता. सात वर्षांत आता रंकाळा पक्षीतीर्थ म्हणून नावारूपाला आला आहे. चिमण्या, कावळे, साळुंख्या, खंड्या, हॉर्न बिल, जकाना, पानकावळे, नामा (कूट), करकोचे, पानकोंबड्या, ब्राह्मणी घार, पाँड हेरॉन, सिगल असे १९ ते २० प्रकारचे पक्षी येथे हमखास आढळतात. त्याशिवाय बोधीवृक्ष, कदंब, गुलमोहर, उंबर, वड, पिंपळ, चिक्कू, पेरू, रेन ट्री, बर्ड चेरी, सातवीन, बहावा, कडुनिंब आदी वीसहून अधिक प्रकारची झाडे आणि फुलझाडांची असंख्य व्हरायटी येथे साऱ्यांनाच टवटवीत करते. चला, तर मग तुम्हीही सहभागी व्हा. पक्षीतीर्थ रंकाळा साऱ्यांनाच साद घालतोय...!

तुम्हीही व्हा सहभागी... 
- येथे जमू या ः मंगळवार (ता. १२), सकाळी सात वाजता, रंकाळा टॉवर

Web Title: Kolhapur New Tree planting on Rankala