शंभर टक्के पर्यावरणपूरक विसर्जनासाठी मोहीम

शंभर टक्के पर्यावरणपूरक विसर्जनासाठी मोहीम

कोल्हापूर - येथील पंचगंगा घाट संवर्धन समिती आणि महापालिकेच्या पुढाकाराने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीबरोबरच कृतिशील उपक्रमांवरही भर दिला जाणार आहे. शनिवारी (ता. १९) जनजागृती फेरी होणार असून, सकाळी नऊला भवानी मंडपातून फेरीला प्रारंभ होईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अतुल इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रमोद पुंगावकर, उमेश ससे, शैलेश टांकसाळकर, उज्ज्वल नागेशकर, सुरेश मिरजकर, मानसिंग वैद्य, डॉ. प्रदीप पवार, प्रदीप बीडकर आदी उपस्थित होते.

शनिवारी भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गंगावेश ते पंचगंगा घाट असा फेरीचा मार्ग राहील. महापौर हसीना फरास, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आदींची प्रमुख उपस्थिती असेल. फेरीत चारधाम येथील नद्यांच्या पवित्र पाण्याच्या कलशांसह प्रबोधनात्मक फलकांचा समावेश असेल. २६ ऑगस्टला दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन असून, कोटीतीर्थ येथे पर्यावरणपूरक विसर्जन कुंडांची व्यवस्था असेल. ३१ ऑगस्टला घरगुती गणपती विसर्जन असून, पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ आदी ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनाची सोय असेल. पर्यावरणपूरक विसर्जन करणाऱ्यांना महापालिकेतर्फे ‘सुज्ञ सुजाण कोल्हापूरकर’ म्हणून प्रमाणपत्र दिले जाईल. 

महापालिका, जिल्हा परिषद, जोतिरादित्य डेव्हलपर्स, कोल्हापूर हॉटेलमालक संघ, श्रीराम फौंड्री (झंवर समूह), डी. आर. कन्स्ट्रक्‍शन्स, शिवाली भय्यासाहेब घोरपडे ग्रुप, कोरगावकर ट्रस्ट, जिल्हा बार असोसिएशन, अवनी व एकटी संस्था आदी संस्था व संघटनांचा या मोहिमेत समावेश असेल. 

अशी असेल व्यवस्था
पर्यावरणपूरक विसर्जनाच्या ठिकाणी ठेवलेल्या काहिलीत चार धाम येथील नद्यांचे पाणी असेल. आरतीसाठी स्वतंत्र टेबलांची व्यवस्था असेल. पर्यावरणपूरक विसर्जनानंतर ‘सुज्ञ सुजाण कोल्हापूरकर’ असे महापौर व आयुक्तांच्या सहीचे प्रमाणपत्र संबंधित व्यक्तींना दिले जाईल. 

तुम्हीही व्हा सहभागी
२०१५ आणि २०१६ मध्ये हा प्रयोग ८० टक्के यशस्वी झाला. यंदा शंभर टक्के प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना या मोहिमेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी इच्छा असेल, त्यांनी रविवार (ता. २०) पासून पुढे तीन दिवसांत समितीशी संपर्क साधावा, असे आवाहनही समितीने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com