जयसिंगपुरात जैन मंदिरात १४ लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

जयसिंगपूर - येथील तिसऱ्या गल्लीतील जैन श्‍वेतांबर मंदिरातून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड, २० तोळे सोने, १० किलो चांदी असा १४ लाखांचा मुद्देमाल पळविला. मंगळवारी मध्यरात्री ही चोरी झाली. जयसिंगपूर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणने संयुक्त तपास सुरू केला असून पोलिसांची दोन पथके तपासासाठी रवाना झाली आहेत.

जयसिंगपूर - येथील तिसऱ्या गल्लीतील जैन श्‍वेतांबर मंदिरातून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड, २० तोळे सोने, १० किलो चांदी असा १४ लाखांचा मुद्देमाल पळविला. मंगळवारी मध्यरात्री ही चोरी झाली. जयसिंगपूर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणने संयुक्त तपास सुरू केला असून पोलिसांची दोन पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर मंदिरातील दानपेट्यांच्या चोरीचा छडा अद्याप लागलेला नसताना ही चोरी झाल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे.

शहरातील तिसऱ्या गल्लीतील स्टेशन रोडलगत जैन श्‍वेतांबर मंदिर आहे. मंगळवारी मंदिरातील रखवालदार परशराम नार्वेकर नेहमीप्रमाणे मंदिरालगतचे कार्यालय बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कटावणीसारख्या हत्याराने कार्यालयाचे कुलूप उचकटून कार्यालयात प्रवेश केला. लोखंडी कपाट कटावणीच्या साहाय्याने उचकटून स्ट्राँग रूममधील लॉकरच्या चाव्या घेतल्या. दुसऱ्या खोलीतील स्ट्राँग रूममधील देवाचे आठ तोळे सोन्याचे चार हार,  पाच तोळ्याचे गोकाक डिझाईनचा सात पदरी सोन्याच्या मण्यांचा दोन हार, एक तोळ्याचा नेकलेस असे २० तोळ्याचे सोन्याचे दागिने, १० किलो सोन्यांचे दागिने तसेच रोख ५ लाख रुपये घेऊन पोबारा केला. जाताना कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला चोरट्यांनी आणलेले कुलूप लावले.

दोन चोरटे...
मंदिरात चोरी करून बाहेर पडणाऱ्या चोरट्यांना एका महिलेने पाहिल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. तिने तशी माहिती पोलिसांना दिली. चोरटे दोघे असल्याचे व त्यापैकी एक उंच व काळा तर दुसरा बुटका असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

बुधवारी सकाळी नार्वेकर कार्यालय उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. कार्यालयाला दुसरेच कुलूप लावल्याचे त्यांना दिसले. त्यांनी मंदिराचे पुजारी पुखराज रावल यांना चोरीच्या प्रकाराची माहिती दिली. मंदिराचे विश्‍वस्त भरत बागरेचा, भरत शहा, जयंतीलाल ओसवाल, राजू ओसवाल, युवराज शहा, महेंद्र पोरवाल आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती जयसिंगपूर पोलिसांना दिली.

जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम, उपनिरीक्षक किरण दिडवाघ यांनी घटनास्थळी पाहणी केली. उपविभागीय पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे, इचलकरंजी व कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी, फिरोज बेग, महेश खोत, विजय तळसकर, सागर पाटील, संदीप मळमणे, संदीप फडतारे यांच्यासह सांगली जिल्हा गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख, सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनीही घटनेची माहिती घेतली. ठसेतज्ज्ञ स.पो.नि. गायत्री पाटील, हवालदार अर्जुन बिंदरे यांनाही पाचारण करण्यात आले. या वेळी त्यांनी कपाटासह दरवाजा व अन्य ठिकाणचे ठसे तपासले. ‘स्टेला’ श्‍वानाने घटनास्थळापासून स्टेशन रोडमार्गे रेल्वे रुळापर्यंत माग काढला. अमीरचंद बागरेचा यांनी जयसिंगपूर पोलिसांत घटनेची फिर्याद दिली आहे. 

चोरट्यांनी अगदी पद्धतशीरपणे चोरी केली आहे. चोरीची पद्धत लक्षात घेता मंदिरातील कार्यालयाची माहिती असणाऱ्यांनी चोरी केली असावी या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलिस पोचले आहेत. जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगार गायब
जैन श्‍वेतांबर मंदिरातील चोरीच्या प्रकारानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास केंद्रित केला आहे. काही गुन्हेगारांकडून माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते तर काहींनी भीतीपोटी शहर सोडून पोबारा केल्याचे समजते. 

श्‍वानाचा माग... रेल्वेची वेळ
श्‍वानाने चोरट्यांचा रेल्वे रुळापर्यंतचा माग दाखवला आहे. चोरट्यांनी रेल्वेने मिरज अथवा कोल्हापूरकडे पळ काढला असण्याचा निष्कर्ष काढला जात आहे. चोरीनंतर चोरट्यांनी रेल्वेने पोबारा केल्याचे गृहीत धरल्यास रेल्वेच्या वेळा आणि मिरज तसेच हातकणंगले, कोल्हापूर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिस करत आहेत.

सीसीटीव्हीची नुसती चर्चाच
शहरात सीसीटीव्ही बसविण्यासह अन्य विषयांसाठी पालिकेची सभा गणपूर्तीअभावी रद्द झाली. ग्रामदैवत सिद्धेश्‍वर मंदिरातील दानपेट्या पळविल्यानंतर मोक्‍याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यावर चर्चा झाली. पोलिसांनीही आग्रह धरला. मात्र वादावादीत प्रत्यक्ष निर्णयच झालेला नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

फुटेज ताब्यात
‘स्टेला’ श्‍वानाने घटनास्थळापासून स्टेशन रोडमार्गे रेल्वे रुळापर्यंतचा माग काढून पोलिस तपासाला दिशा दिली. मंदिरापासून स्टेशनकडील मार्गावरील ठिकठिकाणी असणारे सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या फुटेजच्या साह्याने तपास केला जात आहे.

Web Title: Kolhapur News 14 lakhs stolen in Jain temple at Jaysingpur