गडहिंग्लजमध्ये 67 कोटींचा अर्थसंकल्प सादर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

गडहिंग्लज - कोणतीही करवाढ अगर दरवाढ न करता येथील पालिकेचा 67 कोटींचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आजच्या विशेष सभेत सादर केला. दुरुस्ती आणि चर्चेअंती 84 लाखांच्या या शिलकी अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली. विशेष करून महिला, क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य सेवेवर भरीव तरतूद करण्यात आली आहे.

गडहिंग्लज - कोणतीही करवाढ अगर दरवाढ न करता येथील पालिकेचा 67 कोटींचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आजच्या विशेष सभेत सादर केला. दुरुस्ती आणि चर्चेअंती 84 लाखांच्या या शिलकी अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली. विशेष करून महिला, क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य सेवेवर भरीव तरतूद करण्यात आली आहे.

शासनाकडून आगामी वर्षभरात 35 कोटींचा निधी आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाहीही या अर्थसंकल्पाद्वारे देण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा स्वाती कोरी होत्या. 

सौ. कोरी यांनी अर्थसंकल्पीय भाषण केले. त्या म्हणाल्या, ""नागरिकांचे स्वास्थ्य, शिक्षण, आयुर्मान, उत्पन्न अशा गोष्टींचा विचार करून समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचा हा अर्थसंकल्प आहे. करवाढ नसल्याने नागरिकांवर कोणताही बोजा नाही. पालिकेच्या उत्पन्नाचे मोठे स्त्रोत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जादा असतो. यामुळे शासनाकडून विकासकामांसाठी निधीची मागणी करावी लागते. जमेपेक्षा खर्चाची बाजू जादा असल्याने शासनाकडून अधिकाधिक निधी आणण्याचा प्रयत्न आहे. माजी आमदार श्रीपतराव शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक व सरकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून हा निधी आणण्याचा प्रयत्न आहे. स्वच्छ, सुंदर गडहिंग्लजसाठी 2017-18 वर्षाचा 65 कोटीचा सुधारित तर आगामी वर्षाचा 67 कोटींचा अनुमानित अर्थसंकल्प सभागृहाने मंजूर करावा.'' 

पक्षप्रतोद बसवराज खणगावे यांनी हा अर्थसंकल्प सर्व स्तरांतील समाजाशी निगडित असून दहन व दफन विधीसाठी सात लाखांची तरतूद करण्याची सूचना मांडली.

बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर म्हणाले, ""सर्व घटकांच्या विकासाला स्पर्श करणारा हा अर्थसंकल्प आहे. स्मशानभूमी, नदीघाट विस्तार, वैद्यकीय प्रतिपूर्ती, शहर सौंदर्यीकरण, वाचनालयातर्फे यूपीएससी, एमपीएससी पुस्तक खरेदीच्या तरतुदीत वाढ करण्याची सूचना आहे.'' दोन टक्के व्याज सोडून घरफाळा भरण्याचे आवाहन केली तरी, कर विभागाकडून दंडासहीत कर भरण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकाद्वारे केली जात आहे.

प्रशासनाची ही पद्धत चुकीची असून आवाहनानुसार नागरिकांकडून व्याज सोडूनच घरफाळा भरून घ्यावा, असा आदेश सौ. कोरी यांनी प्रशासनाला दिला. संकेश्‍वर रोड ते मराठा मंदिरपर्यंतचा रिंगरोड 80 टक्के पूर्ण झाला असून उर्वरित कामाच्या निधीसाठी नवि-6 योजनेतून प्रस्ताव पाठविण्याची सूचना हारुण सय्यद यांनी मांडली. 

फुगीर अर्थसंकल्प 
विरोधी पक्षनेते हारुण सय्यद म्हणाले, ""गतवर्षी पालकमंत्री पाटील यांच्याकडे सत्तारूढांनी 17 कोटी निधीची मागणी केली होती. त्यापैकी किती निधी मिळाला, हा प्रश्‍न आहे. दिलेला निधी परत घेण्याची शासनाची सवय आहे. तरीसुद्धा शासनाकडून अपेक्षित केलेल्या निधीचे आकडे फुगविलेले आहेत. शहर स्वच्छ व सुंदर व्हावे ही आमचीही भूमिका आहे. कॉंक्रिट रस्त्यावर डांबरीकरणाचे कार्पेट, संकेश्‍वर रोडवरील खुली जागा विकसित करणे, मटण मार्केटमागील नाल्याचे आरसीसी ट्रेचिंग करणे, पंतप्रधान विमा योजना, कुंभार समाजाची उन्नती, ढोर वसाहतीचा विकास यावरही भरीव तरतूद व्हावी.'' 
 
दृष्टिक्षेपात 2018-19 चा अर्थसंकल्प 
जमेची बाजू 

- प्रारंभिक शिल्लक : 8 कोटी 32 लाख 
- महसूल जमा : 19 कोटी 64 लाख 
- भांडवली जमा : 39 कोटी 97 हजार 
- एकूण अनुमानित अर्थसंकल्प : 66 कोटी 97 लाख 
 
खर्चाची बाजू 
- महसूली खर्च : 21 कोटी 12 लाख 40 हजार 
- भांडवली खर्च : 45 कोटी 59 हजार 
- शिल्लक रक्कम : 84 लाख 450 रूपये. 

गत अर्थसंकल्पातील पूर्तता 
- 1 कोटी 40 लाखाचे योग भवन 
- शववाहिका खरेदी, शाळांमध्ये ई-लर्निंग, संगणक केंद्र लोकसहभागातून 
- कचरा वर्गीकरण मशिनची दुरूस्ती 
- मीटर पद्धतीने पाणीपुरवठा 
- ओपन स्पेस विकसीत, चौक सुशोभिकरण 
- अपंग कल्याणासाठी 11 लाख 
- लेक वाचवा अभियाना सव्वा पाच लाख 

अर्थसंकल्पातील ठळक तरतूदी 
- लेक वाचवा अभियान : 8 लाख 
- अपंग कल्याण : 9 लाख 
- सांस्कृतिक हॉल : 4 कोटी 5 लाख 
- सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लोकवर्गणी : 54 लाख 
- घनकचरा प्रक्रिया सुविधा : 15 लाख 
- सौर उर्जा प्रकल्प : 20 लाख 
- नवीन अग्निशमन खरेदी : 35 लाख 
- ढोर समाज विकास : 21 लाख 
- पालिका क्रीडा स्पर्धा, नगराध्यक्ष चषक स्पर्धा : 20 लाख 
- भूसंपादन खर्च : 25 लाख 
- महिला बालकल्याण : 15 लाख 
- शौचालय अनुदान 5 लाख, गडहिंग्लज महोत्सव साडेपाच लाख 
- शिक्षण मंडळ : 25 लाख 
- रस्ते, गटार बांधणी : 1 कोटी 50 लाख 
- बालआनंद मेळावा : 5 लाख, वाचनालय : 10 लाख 
- पाच टक्के मागास दुर्बल घटक विकास : 21 लाख 
- कर्मचारी सातवा वेतन : 1 कोटी 
- कर्मचारी निवृत्ती वेतन : पावणेदोन कोटी 
- कर्मचारी वेतन 4 कोटी 

Web Title: Kolhapur News 67 cores Budget of Gadhinglaj Corporation